दिवाळीत मिळणाऱ्या बोनसामागे आहे जुना किस्सा,जाणून घ्या कशी झाली या प्रथेला सुरुवात

दिवाळी हा फक्त दिवे, फटाके आणि गोडधोड पदार्थांचा सण नसून तो आनंद, ऐक्य आणि कुटुंबियांसोबत साजरा करण्याचा काळ आहे. या काळात नोकरी करणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट म्हणजे दिवाळी बोनस. प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना मिळणारा हा बोनस त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो. पण ही परंपरा नेमकी कधी आणि कशी सुरु झाली? यामागचा इतिहास खूपच रोचक आहे. (history of diwali bonus in india)

दिवाळी बोनसची सुरुवात

दिवाळी बोनसची सुरुवात ब्रिटिशांच्या काळात, 1940 च्या दशकात झाली. तेव्हा कामगारांचा पगार वर्षातील 52 आठवड्यांऐवजी 48 आठवड्यांवर आणण्याचा प्रयत्न केला गेला. या निर्णयाला कामगारांनी तीव्र विरोध केला. कामगारांना शांत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मनोबलासाठी सरकारने “दिवाळी बोनस” जाहीर केला. याच क्षणापासून या परंपरेची सुरुवात झाली.

पुढे 1965 मध्ये पेमेंट ऑफ बोनस कायदा लागू झाला आणि बोनस देणं हे कायदेशीर स्वरूपात बंधनकारक ठरलं. या कायद्यानुसार कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या किमान 8.33% रक्कम बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना देणं आवश्यक ठरलं.

आजचा दिवाळी बोनस

आजही ही परंपरा सुरू आहे. केंद्र सरकारकडून, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून आणि रेल्वे कर्मचार्‍यांपासून ते केंद्रीय निमलष्करी दलांपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो. साधारणपणे हा बोनस 30 दिवसांच्या पगाराएवढा असतो. 2024-25 मध्ये सुमारे 38 लाख कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यात आला. या बोनसची सरासरी रक्कम 7 हजार रुपयांच्या आसपास होती.

बोनसचे फायदे

दिवाळी बोनस हा फक्त आर्थिक आधार नाही, तर त्यामागे अनेक फायदे आहेत:

– सणासुदीच्या काळात वाढणारा खर्च भागवण्यासाठी मदत

– कुटुंबासाठी नवीन खरेदी आणि गोडधोड पदार्थ बनवण्याची सोय

– कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ

– कार्यक्षमतेत सुधारणा

– सणासुदीच्या खरेदीमुळे बाजारपेठेला चालना मिळून अर्थव्यवस्थेलाही फायदा

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा क्षण

केंद्रीय सरकारी कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आणि केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी वर्षभर या बोनसची आतुरतेने वाट पाहतात. कारण हा बोनस त्यांच्या सणाचा उत्साह दुप्पट करतो आणि आर्थिक नियोजनाला हातभार लावतो.

दिवाळी बोनस हा केवळ पगाराचा भाग नाही, तर भारतीय कामगारांच्या हक्काची जपणूक करणारी परंपरा आहे. ब्रिटिश काळातल्या आंदोलनातून सुरु झालेला हा बोनस आज कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या दिव्यांइतकं तेज आणतो.

Comments are closed.