Asia Cup Final: कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी पत्रकाराला दिलं हटके स्टाईलने उत्तर! जाणून घ्या काय म्हणाला?
आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव अभिषेक शर्मा (Suryakumar Yadav & Abhishek Sharma) सोबत पत्रकार परिषदेला आला. या वेळी पाकिस्तानच्या एका पत्रकाराने सूर्याकडे (Suryakumar Yadav) टीम इंडियाच्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारला. त्याने विचारलं की, भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन (हँडशेक) केलं नाही, सलमान अली आगा सोबत फोटोशूटही केलं नाही. या राजकीय स्वरूपाच्या प्रश्नावर सूर्यानं रोहित शर्मा जसं उत्तर द्यायचा तशा अंदाजातच जोरदार प्रत्युत्तर दिलं.
पहलगाम हल्ल्यामुळे अनेक लोक भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना होण्याच्या विरोधात होते. या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी ठरवलं की, सामना तर खेळायचा, पण सामन्याच्या आधी किंवा नंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करायचं नाही. इतकंच नव्हे तर सूर्यकुमार यादवने पीसीबी प्रमुख आणि एसीसी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला.
सामन्यानंतर पाकिस्तानच्या एका पत्रकाराने सूर्याकडं प्रश्न केला, या संपूर्ण स्पर्धेत तुमचं पाकिस्तान टीमसोबतचं वर्तन असं होतं की तुम्ही हँडशेक केलं नाही, ट्रॉफीसाठी फोटोशूट केलं नाही आणि नंतर राजकीय रंग असलेली पत्रकार परिषद घेतली. तुम्हाला वाटतं का की क्रिकेटमध्ये राजकारण घेऊन येणारे तुम्ही पहिले कर्णधार आहात?
त्यावर सूर्यानं सुरुवातीला म्हणलं, बोलायचं की नाही बोलायचं? मग हसत-हसत एका मिम व्हिडिओच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं, गुस्सा हो रहे हो आप? प्रश्न तर समजला नाही, तुम्ही चार प्रश्न विचारले. दरम्यान सोशल मीडियावर असाच एक मिम खूप व्हायरल झालाय ज्यात हेच वाक्य आहे, गुस्सा हो रहे हो आप. सूर्यानं दिलेल्या या उत्तरावर तिथं बसलेल्या सगळ्यांच्या जोरदार हशा फुटला.
यानंतर एका पत्रकाराने विचारलं, आज बीसीसीआयनं एसीसीला मेल केला की आम्ही मोहसिन नकवीकडून ट्रॉफी घेणार नाही. हे अधिकृत होतं का की तुमचा वैयक्तिक निर्णय? त्यावर सूर्याने उत्तर दिलं, मला माहीत नाही तुम्ही कोणत्या मेलची चर्चा करत आहात, पण हा निर्णय आम्ही मैदानावरच घेतला आणि आम्ही वाट बघत होतो. तुम्ही जेव्हा जिंकता, इतकं चांगलं खेळता, तेव्हा ट्रॉफी तुम्ही डिजर्व करता की नाही? यावर पत्रकाराने ‘हो’ असं म्हटलं, तर सूर्याने लगेच उत्तर दिलं, मग उत्तर तुम्हीच दिलंत.
Comments are closed.