ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब सुरुच,औषध क्षेत्रानंतर सिनेमावर तब्बल 100 टक्के टॅरिफ लादत म्हणाले
न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सिनेमांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या औषधांच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लादलं आहे. अमेरिकेला पुन्हा महान बनवायचं असं देखील ट्रम्प म्हणाले.
Donald Trump Tariff on Cinema : अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या सिनेमांवर टॅरिफ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. आता ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनलेल्या सिनेमांवर 100 टक्के टॅरिफ लावत असल्याचं जाहीर केलं. हे टॅरिफ जाहीर करताना ट्रम्प म्हणाले की जसं लहान मुलाच्या हातातील कँडी चोरुन घेतली जाते, तसंच इतर देशांकडून सिनेमा उद्योग अमेरिकेच्या हातातून चोरुन घेण्यात आला. याचा फटका कॅलिफोर्नियाला त्यांच्या कमजोर आणि अक्षम गव्हर्रनरमुळं बसला आहे. त्यामुळं या आदेशानुसार दीर्घकाळ आणि कधीच न सुटणाऱ्या प्रश्नासाठी अमेरिकेबाहेर बनलेल्या कोणत्याही सर्व चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, अमेरिकेला पुन्हा महान बनवुया, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब सुरुच
अमेरिकेचं अध्यक्षपद दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लावले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवणार असल्याचं म्हटलंय. यासाठी ते विविध देशांवर दबाव आणून व्यापारी करार करत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी कराराबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्याप व्यापारी करार अंतिम झालेला नाही. तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. याशिवाय भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. म्हणजे अमेरिकेंन भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलंय.
अमेरिकेबाहेर बनलेल्या औषधांवर 100 टक्के टॅरिफ
डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेतील औषध निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर 100 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. बाहेरुन येणारी औषधं अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचं देखील ते म्हणाले होते. अमेरिकेत औषध निर्मिती प्रकल्प उभारणी सुरु असलेल्या कंपन्यांना त्यातून सूट देण्यात आली होती. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या औषधांमध्ये भारतात तयार होणाऱ्या औषधांची संख्या अधिक होती. त्याचा फटका भारतीय कंपन्यांना बसू शकतो.
आणखी वाचा
Comments are closed.