झुरळांनी बनविलेले चित्रकला …

सध्या सोशल मिडिया बहरत चालला आहे. अनेक प्रकारची अनोखी माहिती त्यावरुन प्रसारित करण्यात येत आहे. ती खरी की खोटी हा प्रश्न असला, तरी कित्येकदा ती सनसनाटी असते, हे निश्चित आहे. सध्या, असाच एक व्हिडीओ प्रसारित केला जात आहे. एका झुरळाच्या साहाय्याने एका कलाकाराने एक पेंटिंग काढले असून ते त्याने 9 कोटी रुपयांना विकायला काढले असल्याचा संदेश या व्हिडीओतून दिला जात आहे. असे प्रतिपादन केले जात आहे, की एका प्रसिद्ध चित्रकाराने एका पांढऱ्याशुभ्र कापडावर एका झुरळाच्या पायांना रंग लावून त्याला सोडले. ते झुरळ जसजसे त्या कापडावर फिरु लागले, तसतशा त्याच्या पायांच्या रेषा त्यावर उमटू लागल्या. या रेषांच्या आपल्या ब्रशचे स्ट्रोक्स देऊन या कलाकाराने ही कलाकृती निर्माण केली आहे. त्याची किंमत त्याने तब्बल 9 कोटी रुपये ठेवली आहे. तर ज्यांना हे झुरळ पेंटिंग विकत घ्यायची इच्छा असेल, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनही या व्हिडीओत लोकांना करण्यात आले आहे.

हा व्हिडीओ सोशल मिडियावर अत्यंत लोकप्रिय होत आहे. आतापर्यंत 5 कोटी दर्शकांनी तो पाहिला आहे. त्यावर अनेक कॉमेंटस् केल्या गेल्या आहेत. अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे, की झुरळाने काढलेले पेंटिंग, इत्यादी सर्व ठीक आहे, पण त्याची किंमत 9 कोटी रुपये ठेवण्याचे कारण काय ? तसेच इतक्या किमतीला ते घेणार कोण ? तसेच अनेक दर्शकांनी हा एक प्रसिद्धी स्टंट असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनविलेले पेंटिंग आहे, अशीही समजूत अनेकांनी व्यक्त केली आहे. हे पेंटिंग ‘क्रिएटिव्ह’ आहे. मात्र, त्याची किंमत असाधारण आहे, असा सर्वसाधारण अभिप्राय आहे. कलाकाराच्या अपेक्षेइतकी किंमत या पेंटिंगला मिळेल की नाही, हे अनिश्चित आहे. तथापि, झुरळाचे साहाय्य घेऊन पेटिंग बनविण्याची कल्पना अफलातून आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. या पेंटिंगच्या बाजारी भवितव्याची माहिती आणखी काही दिवासांनी उपलब्ध होणे शक्य आहे.

Comments are closed.