बाहेरच्या चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ, डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला आणखी एक धक्का

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जगाला आणखी एक धक्का दिला. खाद्यपदार्थ, औषधे यांच्यानंतर सिनेउद्योगांना टॅरिफच्या कक्षेत आणत अमेरिकेबाहेर बनलेल्या चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा त्यांनी केली. अमेरिकेत चांगला गल्ला जमवणाऱ्या बॉलिवूडच्या चित्रपटांना याचा मोठा फटका बसणार आहे.

’टथ सोशल’ या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत ट्रम्प यांनी नव्या निर्णयाची माहिती दिली. ’एखाद्या चिमुकलीच्या हातातून कँडी चोरावी तशा पद्धतीने इतर देश अमेरिकेतील चित्रपटनिर्मिती उद्योग चोरत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. कॅलिफोर्नियाला याचा मोठा फटका बसत आहे. कमकुवत आणि अक्षम गव्हर्नरमुळे त्यात भर पडली आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी 100 टक्के टॅरिफचा पर्याय मी निवडला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पुन्हा सत्तेवर आल्यापासून ट्रम्प यांनी ’अमेरिका फर्स्ट’ आणि ’मेक अमेरिका ग्रेट अगेन’चा राग आळवणे सुरू केले आहे. अमेरिकेत उत्पादन वाढावे व रोजगार वाढावेत म्हणून ते एका मागोमाग एक निर्णय घेत आहेत. टॅरिफ आणि एच1 बी व्हिसा शुल्कवाढीचा निर्णय त्याचाच भाग आहे.

ममदानी महापौर झाल्यास न्यूयॉर्कचा निधी रोखणार

न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या शर्यतीत असलेले डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांना ट्रम्प यांनी तीव्र विरोध केला आहे. ममदानी महापौर झाल्यास न्यूयॉर्क शहराचा निधी रोखण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कम्युनिस्ट ममदानी यांनी आजवर कुठल्याही महापौरांना करावा लागला नसेल इतक्या अडचणींचा सामना करावा लागेल. त्यांना माझ्याकडून निधीची गरज लागेल हे त्यांनी विसरू नये, अशी धमकीही त्यांनी दिली.

यूएसबाहेरच्या फर्निचरवरही टॅरिफ

अमेरिकेबाहेर बनविण्यात येणाऱया फर्निचरवर मोठे टॅरिफ लावण्याची घोषणाही त्यांनी आज केली. नॉर्थ कॅरोलिना हे अमेरिकेतील फर्निचर निर्मितीचे केंद्र आहे. मात्र येथील जवळपास सर्व फर्निचर निर्मिती उद्योग चीन आणि इतर देशांनी पळवला आहे. नॉर्थ कॅरोलिनाला ते वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी देशाबाहेर बनलेल्या फर्निचरवर मोठे टॅरिफ लावणार आहे. लवकरच त्याबाबत सविस्तर माहिती देईन, असेही ट्रम्प म्हणाले.

Comments are closed.