नालेसफाईत पहिल्याच दिवशी काढला 25 मेट्रिक टन कचरा, तरंगत्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व वॉर्डमध्ये आज राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत तब्बल 25.25 मेट्रिक टन तरंगत्या कचऱ्याचे संकलन करण्यात आले. यामध्ये 735 कामगारांनी 73 यंत्रांच्या सहाय्याने ही मोहीम राबवली.
मुंबई शहर व उपनगरे परिसरातील नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी पालिकेने 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत विशेष मोहीम हाती घेतली आहे. विभागीय पातळीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश नाल्यांमधील तरंगता कचरा संकलित करणे व त्याची विल्हेवाट लावणे हा आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय विभागांत आजपासून या विशेष स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत लोकसहभागही मोठा होता, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
Comments are closed.