क्रिकेटर्स, कलाकारांची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते
ऑनलाईन बेटिंग अॅपमधील व्यवहारामुळे ईडीच्या रडारवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) लवकरच काही खेळाडू आणि अभिनेत्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करणार असल्याचे समजते. ऑनलाईन बेटिंग अॅप ‘वनएक्सबेट’च्या जाहिरातीसंदर्भात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ही कारवाई केली जाऊ शकते. काही सेलिब्रिटींनी ‘वनएक्सबेट’ अॅपमधून मिळालेल्या जाहिरातीच्या पैशाचा वापर विविध प्रकारच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला आहे. या मालमत्ता गुह्यातून मिळालेल्या रकमेच्या माध्यमातून साकारल्याचे मानले जाते. ईडी लवकरच सेलिब्रिटींच्या या जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश जारी करू शकते. काही सेलिब्रिटींच्या संयुक्त अरब अमिराती (युएई) सारख्या देशांमध्येही मालमत्ता आहेत. त्यांची किंमत आणि मूल्यांकन सध्या केले जात आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून, ईडीने ‘वनएक्सबेट’ अॅप प्रकरणात क्रिकेटपटू युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, शिखर धवन, अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि अंकुश हाजरा या सेलिब्रिटींची चौकशी केली आहे. तसेच काही ऑनलाईन प्रचारकांचीही चौकशी करण्यात आली. आता तपास यंत्रणांकडून त्याबाबत सखोल अध्ययन केले जात आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) गुन्हेगारीशी संबंधित मालमत्ता जप्त केल्या जातात. त्यांच्या आर्थिक व्यवहारांसंबंधीची माहिती पीएमएलए अंतर्गत स्थापन केलेल्या न्यायिक प्राधिकरणाकडे पाठवून फेरतपासणीअंती न्यायालयाच्या मान्यतेनंतर आरोपपत्र दाखल केले जाईल.
बँक खात्यांसह व्यवहारांची तपासणी
ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 50 अंतर्गत खेळाडू, अभिनेते आणि प्रचारकांचे जबाब नोंदवले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या बँक खात्यांचे आणि व्यवहारांचे तपशील देखील दिले असून त्यात त्यांनी जाहिरात शुल्क कसे मिळवले हे उघड केले आहे. इतर अनेक खेळाडू आणि अभिनेते अजूनही चौकशीसाठी ‘क्यू’ मध्ये आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेला (‘वनएक्सबेट’ची इंडिया अॅम्बेसेडर) यांनाही समन्स बजावण्यात आले होते, परंतु त्या त्यावेळी परदेशात असल्याने त्या हजर राहिल्या नाहीत.
फसवणूक आणि करचोरीचा तपास
सेलिब्रिटींची ईडीकडून झालेली चौकशी बेकायदेशीर बेटिंग अॅप्सशी संबंधित आहे. कंपनीवर व्यक्ती आणि गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा किंवा मोठ्या प्रमाणात करचोरीत सहभागी असल्याचा आरोप आहे. ‘वनएक्सबेट’ ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर असून ती गेल्या 18 वर्षांपासून बेटिंग उद्योगात असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तिचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर बेट लावू शकतात. कंपनीची वेबसाईट आणि अॅप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ‘वनएक्सबेट’ हे संधीवर आधारित गेम अॅप आहे.
केंद्र सरकारकडून बेटिंग अॅप्सवर बंदी
भारतात ड्रीम11, रमी, पोकर इत्यादी फॅन्टसी स्पोर्ट्ससाठी सर्व ऑनलाईन बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय पेंद्र सरकारने अलिकडेच ऑनलाईन गेमिंग बिल 2025 मंजूर केल्यानंतर घेतला आहे. नव्या कायद्यामुळे ऑनलाईन बेटिंग अॅप्सवर पूर्णपणे बंदी आहे. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ड्रीम-11 सारख्या फॅन्टसी स्पोर्ट्स गेम्सना कौशल्याचे खेळ म्हणून घोषित केले. तथापि, भारतात बेटिंग अॅप्स कधीही कायदेशीर नव्हते. ऑनलाईन बेटिंग अॅप्समुळे लोकांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. काही लोकांना गेमिंगचे इतके व्यसन लागले आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बचत गमावली असून काही प्रकरणांमध्ये आत्महत्या देखील नोंदवल्या गेल्याचे दाखले सरकारने नवीन कायदा तयार करताना निदर्शनास आणून दिले होते.
Comments are closed.