पूरसंकटामुळे यंदा सातारचा शाही दसरा साधेपणाने होणार, पूरबाधितांच्या मदतीसाठी पुढे यावे – उदयनराजे

स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱयात दरवर्षी थाटामाटात, डामडौलात साजरा होणारा शाही दसरा यावेळी महाराष्ट्रावर ओढवलेल्या अतिवृष्टी, महापुराच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारच्या शाही दसऱयाविषयी जनतेत एक अभिमानाची भावना असते. यादिवशी छत्रपतींच्या ‘जलमंदिर’ या निवासस्थानी भवानी तलवारीची विधिवत पूजा केली जाते. सर्वांनाच शाही सीमोल्लंघन, त्यानिमित्त पारंपरिक पद्धतीने निघणारी भव्य मिरवणूक, सोने लुटण्याचा कार्यक्रम याचे अप्रूप असते. मात्र, महाराष्ट्रात विशेष करून मराठवाडा, कोकण, सातारा जिह्यातील पूर्व भाग तसेच एकंदरीत संपूर्ण देशात वरुणराजाने हाहाकार माजवला आहे. यामुळे शेतकरी तर उद्ध्वस्त झाला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील एकंदरीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत सातारचा शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा यंदा थाटामाटात न करता, साधेपणाने साजरा करण्यात येईल. शासनाचा यावर्षीचा निधी पूरबाधितांच्या मदतकार्यासाठी परस्पर वर्ग करावा. तसेच जनता जनार्दनानेही माणुसकीच्या भावनेतून आर्थिक किंवा वस्तू किंवा धान्य स्वरूपातील मदत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहायता निधीमध्ये जमा करावी, असे आवाहन उदयनराजे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments are closed.