घरे- दारे, संसार वाहून गेलेल्यांना 5-10 हजाराची मदत देणे, ही थट्टाच आहे; संजय राऊत यांच्याकडून संताप व्यक्त

मराठवाड्यातील अतिवृष्टी ही दुष्काळच आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाच्या निकषानुसार मदत करण्यात यावी, आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मदतीचे निकष बदलण्याची गरज आहे, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच अद्यापही शेतकऱ्यांनी मदत मिळालेली नाही. घरे- दारे संसार वाहून गेलेल्यांना 5-10 हजारांची मदत करणे म्हणजे थट्टाच आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्री दिल्लीला गेले, पंतप्रधान मोदींना भेटले, त्यांनी अहवाल पाठवण्यास सांगितले, आता कॅबिनेटमध्ये पुन्हा चर्चा होईल,मदतीचे निकष आहेत, ते बदलले जात नाहीत, अशाप्रकारे पूरपरिस्थितीशी किंवा नैसर्गिक संकटांशी सामना केला जात नाही. मुख्यमंत्री एक-दोन दिवस त्या भागात होते, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नियम आणि कायद्यावर बोट ठेवत काम करू नका, असे त्यांनी म्हटले आहे. पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. आजच्या कॅबिनेटमध्ये सर्वात आधी मदतीचे निकष बदलणे गरजेचे आहे. हा दुष्काळच आहे, तो ओला असो की सुका असो, पण हा दुष्काळच आहे. जेव्हा शेतकऱ्यांचे उभे पीक शेतजमीनीसह नष्ट होते आणि पुढील तीन- चार वर्षे ते कोणतेही पीक घेऊ शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा हा दुष्काळच आहे. त्यामुळे या परिस्थितीत दुष्काळाचेच निकष लावण्याची गरज आहे.

शेतकरी अजूनही तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांची घरे-दारे, संसार वाहून गेलेत, त्यांना 5-10 हजाराची तातडीची मदत करण्यात येते, ही थट्टा आहे. वाहून गेलेल्या शेतजमीनीवर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी त्यांना मदत लागेल. ती देण्याची मानसीकता मुख्यमंत्र्यांची किंवा राज्याच्या नेतृत्वाची दिसत नाही, असे ते म्हणाले.

कर्जवसूलीसाठी बँकांकडून जो दट्टा लावला जातोय, तो थांबवायला हवा. मुख्यमंत्री तसा आदेश देऊ शकतात. त्यात अनेक सहकारी बँका आहेत. सरकारकडे सहकारी बँकेत पैसे नसतील तर कॅबिनेटमधील ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेत घोटाळे केलेत, कोणी 70 हजार कोटी, कोणी 10 हजार कोटी, कोणी 5 हजार कोटी ते त्यांच्याकडून वसूल करावे. शेतकऱ्यांकडून वसुलू करण्यापेक्षा कॅबिनेटमधील ज्यांनी बँकेत घोटाळे केलेत, त्यांना नोटीसा पाठवा आणि मग शेतकऱ्यांना नोटीसा पाठवा, असेही ते म्हणाले.

या पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिकवेशन बोलवण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान केलेली आहे. एक किंवा दोन दिवसांचे अधिवेशन घेत त्या-त्या भागातील आमदारांकडून सूचना देण्यात याव्या, ते काय करताय, ते सभागृहासमोर यायला हवे. तरच त्याला एक मान्यता मिळते. ते आता फक्त हवेत घोषणा करत आहे, शेतकऱ्यांपर्यंत मदत किंवा त्यांचा आवाज पोहोचत नाही. आजही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची विशेष अधिकवेशन घेण्याची मागणी आहे, असे ते म्हणाले.

मराठवाड्यातील पूरपरिस्थीत हाताळण्यात सरकारचा बोजावारा उडाला आहे. त्यापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपच्या काही उपकंपन्या राज्यात काही टिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात दंगलीवर चर्चा करण्यापेक्षा अतिवृष्टी, पूरपरिस्थिती यावर चर्चा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, त्यापासून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्येही अतिवृष्टी झाली आहे. तेथील महापालिका हद्दीतील 450 कोटींच्या भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला आहे, आता ते प्रकरण न्यायालयात गेले आहे. ते केले म्हणून आमच्या किरण काळे यांना अटक करण्यात आली. या सर्वांवरचे लक्ष विचलीत करण्यासाठी दंगली घडवण्यात येतात. याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असणारे आणि आता भाजपचा टिळा लावलेले बाटगे या दंगली घडवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

हा देश हिंदुचा आहे आणि देशात हिंदुत्ववाद राहणार आणि प्रभावीपण राहणार, हा आमचा विश्वास आहे. स्वतःला हिंदुत्वावादी म्हणवणाऱ्यांनी या दंगली केल्या, त्यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला विरोध केला नाही. पाकिस्तानी संघाने या सामन्याचे मानधन मसूद अझरच्या दहशतवादी संघटनेला दिले आहे. या गोष्टीला विरोध करण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे दंगल घडवणार भंपक आणि बोगस हिंदुत्ववादी आहेत. अनेक गोष्टी चर्चेतून सुटू शकतात. मात्र, तणाव निर्माण होईल असे निर्णय घ्या, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. पोलिसांनी अशाप्रकारचे वर्तन करणे हे कायदा सुव्यवस्थेसाठी योग्य नाही,असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांना गोळ्या घालू, असे विधान करणाऱ्या भाजप नेत्यावर पंतप्रधान किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी काय कारवाई केली. सोनम वांगचूक यांनी देशहितासाठी, न्याय्य हक्कांसाठी उपोषण केले, त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली. लोकसभेचे विरोध पक्षनेते राहुल गांधी यांना जाहीरपणे गोळी घालण्याची भाषा भाजपचा नेता करतो, त्याच्यावर काहीही कारवाई करण्यात येत नाही. त्या वक्तव्याचा निषेधही करण्यात येत नाही. यावरून या देशात महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याप्रमाणे नेत्यांच्या हत्या व्हाव्यात आणि दंगली घडाव्यात, अशी भाजपची इच्छा दिसत आहे. अशी वक्तव्ये करणाऱ्यांवर गृहमंत्र्यांनी कारवाई करण्याची आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली.

Comments are closed.