'या' मोठ्या लीगमध्ये खेळणार दिनेश कार्तिक, म्हणाला.. 'या फ्रेंचायझीचा भाग होणं म्हणजे स्वप्न साकार…'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक पुन्हा एकदा परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. गेल्या वर्षी कार्तिक दक्षिण आफ्रिकेच्या SAT20 लीगमध्ये खेळला होता. आता तो आंतरराष्ट्रीय टी20 लीग म्हणजेच आयएलटी20 मध्ये खेळणार आहे. या लीगमध्ये तो शारजाह वॉरियर्स संघाचा भाग असेल. कार्तिकने वॉरियर्स संघात श्रीलंकेचा विकेटकीपर फलंदाज कुसल मेंडिस याची जागा घेतली आहे. या संघाचे प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जे. पी. डुमिनी आहेत.

या लीगमध्ये सहभागी होताना दिनेश कार्तिक म्हणाला, “डीपी वर्ल्ड आयएलटी20 स्पर्धेसाठी शारजाह वॉरियर्स संघात सामील होऊन मला खूप आनंद झाला आहे. मला माहित आहे की हा एक तरुण संघ आहे आणि काहीतरी वेगळे करण्याची त्याची जिद्द आहे. इथे येऊन मला खूप आनंद झाला. शारजाह हे त्या प्रतिष्ठित मैदानांपैकी एक आहे जिथे प्रत्येकाला खेळायचे असते. शारजाह वॉरियर्स फ्रँचायझीचा भाग होणे म्हणजे जणू माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे.”

दिनेश कार्तिकसाठी ही दुसरी परदेशी टी20 लीग असेल. याआधी तो दक्षिण आफ्रिकेतील एसए20 मधील पार्ल रॉयल्स संघाचा भाग राहिला आहे. रॉयल्ससाठी त्याने सहा डावांत 97 धावा केल्या होत्या. कार्तिक सध्या आयपीएल 2025 चे विजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरु (RCB) संघाचा फलंदाजी प्रशिक्षकही राहिला आहे.

आरसीबीमध्ये कार्तिकने ऑस्ट्रेलियाच्या टीम डेविडसोबत काम केले होते, जो शारजाह वॉरियर्सच्या परदेशी खेळाडूंमध्ये एक आहे. वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक डुमिनी म्हणाले, “दिनेश कार्तिक हा सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याने टी20 क्रिकेटमध्ये प्रचंड कौशल्य मिळवले आहे. डीपी वर्ल्ड आयएलटी20 च्या आगामी हंगामासाठी तो आमच्या संघात सामील झाल्याने मला खूप आनंद झाला आहे.”

दिनेश कार्तिकच्या नावावर 412 टी20 सामन्यांत 7437 धावा आहेत. या दरम्यान त्याने 136.66 च्या स्ट्राइक रेटने धावा करत 35 अर्धशतकं झळकावली आहेत. भारतासाठी त्याने 60 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 142.61 च्या स्ट्राइक रेटने 686 धावा केल्या आहेत.

Comments are closed.