'माती' पासून संपत्ती

माती आपल्याला श्रीमंतीचा मार्ग दाखवेल, असे कोणी म्हटले, तर आपला विश्वास न बसणे अगदीच स्वाभाविक आहे. तथापि, अशी एक माती आहे, की जी आपल्या हाती लागली, तर आपण धनवान बनणार आहात. सध्या एक व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारित होत आहे. त्यात असे प्रतिपादन करण्यात आले आहे. ही माती शेंगदाण्याच्या लोण्यासारखी, अर्थात, पीनट बटरप्रमाणे मऊ आणि पिवळसर असते. या मातीत एक चमकदारपणा असतो. शास्त्रीयदृष्ट्या ही मातीच असते, पण तिच्यात आपल्याला धनवान बनविण्याची क्षमता असते.

या मातीत सोन्याचे कण नैसर्गिकरित्या मिश्रित झालेले असतात. त्यामुळे तिला पिवळसरपणा आणि तेज प्राप्त झालेले असते, अशा मातीत इतरही अनेक महत्वाची खनीजे असतात. मात्र, एक बाब येथे ध्यानात घेण्यासारखी आहे, की अशी माती तुम्हाला कोणत्याही स्थानी मिळणार नाही. ती केवळ विशिष्ट स्थानीच उपलब्ध असते. नदीचे तळ, किंवा काही विशिष्ट खाणी येथे ती सापडते. अर्थात या व्हिडीओच्या खरेपणाची शंकाही घेण्यात आली आहे. त्यामुळे त्याची सत्यता परीक्षण केले गेले आहे. काही तज्ञांनी असे स्पष्ट केले आहे, की व्हिडीओतील माहिती पूर्ण असत्य आहे, असे नाही. कारण, सोने हा जडधातू आहे. त्याचे वजन इतर सर्वसामान्य धातूंच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे त्याचे कण वाहत्या पाण्याच्या तळाशी जाऊन तेथील मातीत मिसळतात. त्यामुळे अशी माती चमकदार होते. मात्र, ही बाब समजून घेतली पाहिजे, की मुळात त्या परिसरातल्या मातीत काही प्रमाणात सोन्याच्या अंश असावा लागतो. हे सोने कालांतराने या मातीवरुन वाहणाऱ्या पाण्यामुळे नद्यांच्या प्रवाहात मिसळते आणि त्यांच्या तळाशी जाते. म्हणून अशी सुवर्णयुक्त माती नदीच्या तळाशी मिळण्याची शक्यता अधिक असते. या मातीत सुवर्णासमवेत मॅग्नेटाईट, हेमेटाईट अशी खनिजेही असतात. तेव्हा अशी माती असते, पण ती दुर्मिळ असते. तसेच तिला शोधण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. या महत्वाच्या अटी या मातीसंबंधात लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Comments are closed.