पंतप्रधान मोदींनी लडाखच्या लोकांच्या विश्वासाचा विश्वासघात केला

राहुल गांधी यांचा हल्लाबोल : गोळीबाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, लेह

लडाखमधील तणावाच्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर कडक शब्दात हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी लडाखच्या लोकांशी विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. तसेच लेहमध्ये पोलिसांच्या गोळीबारात झालेल्या चार निदर्शकांच्या मृत्यूची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. मृतांमध्ये कारगिल युद्धातील सैनिक त्सेवांग थारचिन यांचाही समावेश असल्याचे सांगत त्यांनी ट्विटरवर थारचिनच्या वडिलांचा व्हिडिओ पोस्ट केला. दरम्यान, गृह मंत्रालयाने मंगळवारी लडाखच्या लेह जिह्यात 3 ऑक्टोबरपर्यंत मोबाईल इंटरनेट आणि सार्वजनिक वाय-फाय सेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.

वांगचुकच्या सुटकेची मागणी तीव्र

लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि पर्यावरण कार्यकर्त्या सोनम वांगचुकसह इतर अटक केलेल्या तरुणांच्या सुटकेची मागणी तीव्र झाली आहे. लडाखमधील परिस्थिती सामान्य होईपर्यंत केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीशी संवाद साधणार नसल्याचे कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने (केडीए) जाहीर केले आहे. तर, लेह एपेक्स बॉडीने (एलएबी) यापूर्वीच संवाद न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 24 सप्टेंबर रोजी ‘एलएबी’ने पुकारलेल्या बंद दरम्यान लेहमध्ये हिंसक निदर्शनानंतर झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. दंगलीच्या आरोपाखाली पन्नास लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात चळवळीचा चेहरा बनलेल्या वांगचुक यांना एनएसए अंतर्गत अटक करत जोधपूर तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

Comments are closed.