लातूर जिल्ह्यात सरासरीच्या 132 टक्के अधिक पाऊस; मांजरा प्रकल्प 100 टक्के भरल्याने लातूरचा पाणी प्रश्न मिटला

लातूर शहरासह जिल्ह्यास पाणीपुरवठा होत असलेल्या मांजरा आणि निम्न तेरणा या प्रकल्पामुळे लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न मिटला आहे. मांजरा प्रकल्पात १०० टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात ९८.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. लातूर जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पापैकी ५ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. परंतु शासनाच्या नाकर्तेपणामुळे मसलगा मध्यम प्रकल्पात फक्त ८.९८ टक्के तर तिरू मध्यम प्रकल्पात ५२.२६ टक्के पाणीसाठा आहे.
लातूर जिल्ह्यात यावर्षी मुबलक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे भरभरून वाहिले असून पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी म्हणून उभारण्यात आलेले मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघू पाटबंधारे प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत. त्यामुळे थोडाही पाऊस झाला तर आलेले पाणी हे नदीपात्रातून सोडून द्यावे लागत आहे. मांजरा प्रकल्पाची पाणी संचय पातळी ही ६४२.३७ मीटर एवढी आहे. आजरोजी १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. २२४.०९३ दलघमी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे १७६.९६३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे तर ४७.१३० दलघमी हा मृत पाणीसाठा आहे.
निम्न तेरणा प्रकल्पात ९८.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात ९८.५९ टक्के, तिरू मध्यम प्रकल्पात ५२.२६ टक्के, मसलगा मध्यम प्रकल्पा ८.९८ टक्के तर रेणापूर मध्यम प्रकल्प, व्हटी मध्यम प्रकल्प, देवर्जन मध्यम प्रकल्प, साकोळ मध्यम प्रकल्प व घरणी मध्यम प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. जिल्ह्यातील १३५ लघू पाटबंधारे प्रकल्पात ९८.२२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने तिरू मध्यम प्रकल्प १०० टक्के भरू शकला नाही. त्याचप्रमाणे मसलगा मध्यम प्रकल्पामध्येही पाणी साठवता आले नाही.
लातूर जिल्ह्यात सरासरीच्या १३२.२ टक्के पाऊस अधिक झाला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ७०६ मि.मी. आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत प्रत्यक्षात ९२६.५ मि.मी. पाऊस झालेला आहे. वार्षिक सरासरीच्या १३२.२ टक्के पाऊस सध्या अधिक झालेला आहे. लातूर तालुक्याची वार्षिक सरसारी ही ६९२ मि.मी. असून, प्रत्यक्षात ८३०.७ मि.मी. म्हणजे १२० टक्के पाऊस झाला आहे.
- औसा तालुक्याची वार्षिक सरासरी ६१२.७ मि.मी. असून, प्रत्यक्षात ८६६.५ मि.मी. म्हणजे १४१.४ टक्के पाऊस अधिक झालेला आहे.
- अहमदपूर तालुक्याची वार्षिक सरासरी ६१४.४ मि.मी. असून, प्रत्यक्षात १०८१.७ मि.मी. म्हणजे १४४.४७ टक्के पाऊस अधिक झालेला आहे.
- निलंगा तालुक्याची वार्षिक सरासरी ६६४.९ मि.मी. असून, प्रत्यक्षात ८४५.५ मि.मी. म्हणजे १२७.२ टक्के पाऊस अधिक झालेला आहे.
- उदगीर तालुक्याची वार्षिक सरासरी ७.५.५ मि.मी. असून, प्रत्यक्षात १०४६.६ मि.मी. म्हणजे १४८.३ टक्के पाऊस अधिक झालेला आहे.
- चाकूर तालुक्याची वार्षिक सरासरी ७६४.५ मि.मी. असून, प्रत्यक्षात ९७९.४ मि.मी. म्हणजे १२८.१ टक्के पाऊस अधिक झालेला आहे.
- रेणापूर तालुक्याची वार्षिक सरासरी ६८२.५ मि.मी. असून, प्रत्यक्षात ८३१.८ मि.मी. म्हणजे १२१.९ टक्के पाऊस अधिक झालेला आहे.
- देवणी तालुक्याची वार्षिक सरासरी ६५४.२ मि.मी. असून, प्रत्यक्षात ८६६.१ मि.मी. म्हणजे १३२.४ टक्के पाऊस अधिक झालेला आहे.
- शिरूर अनंतपाळ तालुक्याची वार्षिक सरासरी ६७९.३ मि.मी. असून, प्रत्यक्षात ११२१.६ मि.मी. म्हणजे १६५ टक्के पाऊस अधिक झालेला आहे.
- जळकोट तालुक्याची वार्षिक सरासरी ७२८.२ मि.मी. असून, प्रत्यक्षात ९३३.८ मि.मी. म्हणजे १२८.१ टक्के पाऊस अधिक झालेला आहे.
Comments are closed.