बंगालची मूलभूत संस्कृती हिंदू आहे.
प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बंगाली जनतेची पायाभूत संस्कृती हिंदूच आहे, असे अत्यंत महत्वपूर्ण प्रतिपादन बंगाली भाषेच्या विख्यात लेखिका आणि विचारवंत तस्लीमा नसरीन यांनी केले आहे. बंगाली मुस्लीमांचीही मूळ संस्कृत हिंदूच आहे, असा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला. त्यांनी लिहिलेल्या एका लेखात ही मते व्यक्त करण्यात आली आहेत.
बंगाली संस्कृतीचा पायाच हिंदू संस्कृती आहे. बंगाली भाषिक माणसाचा धर्म कोणताही असो. तो हिंदू असो किंवा मुस्लीम असो, त्याची मुळे हिंदू संस्कृतीतच आहेत. हे ऐतिहासिक सत्य आहे. ते लपविण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे आहे. बंगाल भागातील लोकांनी इतिहासाच्या एका वळणावर भिन्न धर्माचा स्वीकार केला आहे. तथापि, त्यामुळे मूळ तुटले जात नाही. भारतीयत्व हेच बंगाली जनतेचे राष्ट्रीयत्व आहे आणि हिंदू धर्म हीच बंगाली जनतेची मूळ ओळख आहे, असे स्पष्ट विधान त्यांनी लेखात केले आहे. बंगाल प्रदेशात राहणाऱ्या मुस्लीमांची संस्कृती आजही मूळ अरबी असलेल्या इस्लामी संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या मुस्लीमांची पारंपरिक पाळेमुळे हिंदू परंपरा आणि चालीरिती यांच्यात आहेत. ही बाब कोणीही नाकारु शकत नाही. तसेच ती नाकारणे म्हणजे इतिहासाशी प्रतारणा करण्यासारखे आहे, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी आपल्या लेखात केली आहे.
जावेद अख्तर यांचा विरोध
नसरीन यांच्या विधानाला जावेद अख्तर यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बंगाली संस्कृती समृद्ध आहे. तथापि, ती एकाच धर्माच्या आधारावर बनलेली नसून ती गंगा-जमुना संस्कृतीप्रमाणे दोन संस्कृतींच्या मिश्रणातून विकसीत झालेली आहे. तसेच इतरही अनेक धर्मांचा तो संगम आहे. हिंदू. बौद्ध. जैन, मुस्लीम आदी अनेक रंग या संस्कृतीत आहेत, असे त्यांचे प्रतिपादन आहे.
Comments are closed.