फिलिपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; 31 जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या, ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकले, बचावकार्य सुरू

फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप झाला आहे. रिश्टर स्केलमध्ये याची तीव्रता 6.9 मापण्यात आली आहे. या भूकंपानंतर फिलिपाईन्समध्ये हाहाकार उडाला असून यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सेबुच्या उत्तर किनाऱ्यावर स्थानिक वेळेनुसार रात्री साडे नऊच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. यामुळे आसपासच्या भागातील रहिवासी इमारती कोसळल्या, भूस्खलन झाले, रस्त्यांना तडे गेले, झाडे-विजेची खांब उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडीत झाल्याने शहरात अंधार पसरला.
सुरुवातीला यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने भूकंपाची तीव्रता 7.0 असल्याचे सांगितले. मात्र नंतर ती कमी करण्यात आली. भूकंपामुळे फिलिपाईन्समध्ये हाहाकार उडालेला असून 31 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या भूकंपाचा केंद्रबिंदु सेबू प्रांतातील बोगो सीटीच्या ईशान्येला सुमारे 19 किलोमीटर अंतरावर जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता. यामुळे त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
भूकंपाआधी वादळाचा तडाखा
फिलिपाईन्समध्ये सेबू आणि अन्य प्रांतामध्ये ‘बुआलोई’ या चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे फिलिपाईनमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता. बहुतांश मृत्यू पाण्यात बुडाल्याने आणि झाडे अंगावर पडून झाले होते. या वादळामुळेही अनेक शहरातील आणि भागातील वीज गायब झाली होती.
Comments are closed.