‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना बोनस! दर फरकापोटी मिळणार 136 कोटीहून अधिक रक्कम

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गायीच्या अंतिम दूध दरफरकापोटी तब्बल 136 कोटी 3 लाख रुपयांची उच्चांकी रक्कम 1 ऑक्टोबर 2025 रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती माहिती गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडे दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दूधदर फरक आर्थिक वर्षाच्या शेवटी निश्चित करून तो सणासुदीच्या काळात देण्याची परंपरा आहे. त्यातून गोकुळकडून दूध उत्पादकांना ही दिवाळी भेट असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूधदर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता 66 कोटी 37 लाख 70 हजार रुपये, तर गाय दुधाकरिता 45 कोटी 14 लाख 8 हजार रुपये इतका दूधदर फरक व दरफरकावर 6 टक्केप्रमाणे होणारे व्याज 5 कोटी 52 लाख 89 हजार आणि डिंबेचर व्याज 7.80 टक्केप्रमाणे 10 कोटी 67 लाख 35 हजार रुपये व शेअर्स भांडवलावरती 11 टक्के प्रमाणे डिव्हिडंड 8 कोटी 38 लाख 69 हजार रुपये, असे एकूण 136 कोटी 03 लाख रुपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे, असे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. या दरफरकाचा लाभ कोल्हापूर जिह्यातील तसेच सीमाभागातील गोकुळ संलग्न 8 हजार 12 दूध संस्थांच्या सुमारे 5 लाख दूध उत्पादक सभासदांना होणार आहे.

Comments are closed.