झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी आसाम पोलिसांची मोठी कारवाई, कार्यक्रमाचे आयोजक, व्यवस्थापकाला अटक

प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी आसाम पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक श्यामकानु महंत आणि त्यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना अटक केली आहे. झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी आसाम पोलिसांनी मोठी कारवाई केली, कार्यक्रमाचे आयोजक आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार महंत यांना सिंगापूरमधून नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तर शर्मा यांना गुरुग्राममधील एका अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांनाही बुधवारी सकाळी गुवाहाटी येथे आणण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
१९ सप्टेंबरला आसाम सरकारने सिंगापूरमध्ये गायकाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष पोलिस महासंचालक एमपी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. एसआयटीने महंत, शर्मा आणि सिंगापूरला गेलेल्या इतरांना नोटिसा बजावल्या. त्यांना तपासात सहकार्य करण्यासाठी आणि त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी यापूर्वी सांगितले होते की, इंटरपोलद्वारे महंत आणि शर्मा यांच्याविरुद्ध ‘लूकआउट नोटिस’ जारी करण्यात आली आहे. नोटिसमध्ये त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत गुन्हे अन्वेषण विभागासमोर (सीआयडी) हजर राहण्यास सांगितले आहे.
पोलिस सूत्रांनुसार अटकेनंतर दोघांकडून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपास पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.
Comments are closed.