Nanded News – अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मुलाच्या मृत्यूनंतर पित्यानेही 12 तासात सोडले प्राण

नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला. हे नुकसान पाहून सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने (२९ सप्टेंबर) रात्री शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वृद्ध पित्याने ही घटना त्याच्या कानी पडताच अवघ्या १२ तासातच आपले प्राण सोडले. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात ही घटना घडली. निवृती कदम आणि सखाराम कदम अस पिता पुत्राचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली असतांनाच अचानकपणे ढगफुटी सदृश अतिवृष्टी पाऊस झाला आणि नदी-नाल्यांना प्रचंड महापूर, शेतात गुडघ्यापर्यंत पाणी, त्या पाण्याखाली खरिपाची पिके नासून उध्दवस्त झाली. अशा बिकट परिस्थितीत संसार कसा चालायचा, बॅक आणि सावकाराचे कर्ज कसे फेडायचे ? त्यातच सततची नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा तसेच मराठा समाजाला इतका लढा लढून प्रत्यक्षात आरक्षण कधी मिळेल या विवंचनेत असलेल्या निवृत्ती सखाराम कदम (वय ४८ वर्षे) रा. कोंढा ता. अर्धापूर जि. नांदेड या शेतकऱ्यांने आपल्या शेतात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

वडिलांचा आजार, शेतातील नापिकी, अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट यामुळे खचलेल्या निवृती कदम यांनी मृत्यू पुर्वी ‘ मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची मदत मिळत नसून सरकारचे शेतकऱ्यांना मातीमोल करण्याचे धोरण ‘ अशी चिठ्ठी लिहून ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे वडील सखाराम कदम हे मागील अनेक वर्षांपासून अर्धांगवायू आजाराने पिडीत असून ते अंथरुणावर पडून होते. अवघ्या १२ तासातच वडील सखाराम कदम (वय -८०) यांनाही मुलाच्या घटनेची वार्ता कानी पडताच आपले प्राण सोडले. त्यांच्या पार्थिवावर उद्या १ ऑक्टोबर रोजी कोंढा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अर्धापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.