Kullu Dussehra: ३७५ वर्षे जुना कुल्लू दसरा उत्सव, रावण दहन नव्हे अनोख्या पद्धतीने होतो साजरा
हिंदू धर्मात दसरा हा सण महत्त्वाचा मानला जातो. हा सण विजयाचे प्रतीक मानला जातो. आश्विन शुद्ध दशमीला दसरा सण साजरा केला जातो. या सणाला ‘विजयादशमी’ असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला परत आणले. त्यामुळे हा सण रावण दहन म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र हिमाचल प्रदेशात दसरा हा सण रावण दहन करून नव्हे तर एका अनोख्या पद्धतीच्या उत्सवाने साजरा केला जातो. विशेष म्हणजे या उत्सवाला ३७५ वर्षांची प्रथा आहे. चला तर मग दसऱ्यानिमित्त या उत्सवाबद्दल जाणून घेऊया…
हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये हा उत्सव ‘कुल्लू दसरा’ म्हणून साजरा होतो. या उत्सवाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या दिवशी रावण दहन करत नाहीत तर देवांच्या भेटीगाठी करण्याची प्रथा आहे. म्हणजेच या उत्सवात हिमाचल प्रदेशातील जवळपास प्रत्येक गावात असलेल्या देवता सहभागी होतात. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे देशभर रावण दहन करून दसरा साजरा केला जातो, तेव्हा कुल्लूमध्ये दसऱ्याचा उत्सव सुरू होतो. आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवसापासून सुरू झालेला हा सण पुढील सात दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने सुमारे १००० देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि त्यात सहभागी होतात, अशी स्थानिकांची मान्यता असल्याचे म्हंटले जाते. याच कारणामुळे कुल्लूचा हा दसरा जगभरात प्रसिद्ध आहे. २०२५ मध्ये हा कुल्लू दसरा उत्सव २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या काळात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.
कशी सुरू झाली प्रथा?
या उत्सवात देवी- देवतांच्या सहभागामागे एक प्राचीन कथा आहे. असे म्हणतात, १७ व्या शतकात कुल्लूचे राजा जगत सिंह यांच्यामुळे हा सण या पद्धतीने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या लोभी स्वभावामुळे एका ब्राह्मण कुटुंबाने राजाला शाप दिला होता. या शापामुळे राजा अस्वस्थ झाला आणि त्याची तब्येत बिघडली. जेव्हा सर्व उपाय करून परिणाम दिसला नाही तेव्हा त्याला एका ऋषींनी श्रीरामाची उपासना करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला ऐकून राजाने भगवान श्रीरामाची मूर्ती स्थापन केली आणि त्यावेळी संपूर्ण कुल्लूतील देवतांना आमंत्रित केले. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आणि ३७५ वर्षांहून अधिक काळ उलटला तरी आजही ही प्रथा पाळली जाते.
सात दिवसांच्या उत्सवात सजवलेल्या रथात शंभरहून अधिक देवतांचा सहभाग असतो. या उत्सवात ढोल- ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य आणि वादनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. शेवटच्या दिवशी भगवान श्रीरामाचा रथ दलपूर मैदानावर पोहोचतो ते डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य असते. विशेष म्हणजे हा उत्सव म्हणजे हिमाचल प्रदेशच्या संस्कृतीचा जवळून अनुभव घेण्याची सुवर्णसंधी असते असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. या उत्सवासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात.
Comments are closed.