‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ 31 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित, अंगावर शहारे आणणारा टीझर लाँच

‘’स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’’या दमदार घोषणेने महाराष्ट्रात एका विलक्षण चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=xnfo5ntorku

या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून त्यांच्या सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा – पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी केली असून प्रस्तुती झी स्टुडिओजची आहे. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव न करता, आजच्या महाराष्ट्राशी आणि त्याच्या अनुत्तरित प्रश्नांशी संवाद साधत असल्याचे टीझरवरून कळतेय.

या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक आता उत्सुकतेने करत असून, पहिली झलक पाहून हा चित्रपट वर्षातील सर्वात चर्चेचा ठरणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह निर्मित महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट 31 ऑक्टोबर रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Comments are closed.