मुख्यमंत्री महोदय असलं राजकारण बरं नव्हं…! रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेले शेत डोळ्यासमोर पावासामुळे मातीमोल झाले. एकिकडे शेतकऱ्याची परिस्थिती दयनीय असताना राज्य सरकारकडून अद्याप मदतीची कोणतीही घोषणा झालेली नाही. विरोधकांकडून सातत्याने ओला दुष्काळ जाहीर केली जाण्याची मागणी होत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करता येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे.

2021 साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अतिवृष्टी झाली होती त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्कार जाहीर झालाच पाहिजे अशी मागणी केली होती. या मागणीसाठी ते सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत होते. मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार असताना व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करता येऊ शकत नाही असे म्हटले आहे. त्यांच्या या दोन्ही वक्तव्यांचा व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांनी त्यांना फटकारले आहे.

पहिल्या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचे सरकार असताना ‘ओला दुष्काळ झालाच पाहिजे असे म्हणताना दिसत आहेत”, तर दुसऱ्या व्हिडीओत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओला दुष्काळ मॅन्युअलमध्ये कुठेही नाही असे सांगत आहेत. ”सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होतेय पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळाची नोंद कुठेही नाही. आता पर्यंत ओला दुष्काळ कधीही जाहीर झालेला नाही”, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.

Comments are closed.