नांदिवडे समुद्रकिनाऱ्यावर मृत मासे, जिंदाल कंपनी विरोधात नागरिकांमध्ये संताप
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे समुद्रकिनाऱ्यावर मासे मरून पडलेले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिंदाल कंपनीने दुषित सांडपाणी नांदिवडे समुद्रकिनारी सोडल्याचा आरोप नांदिवडेचे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे यांनी केला आहे.
जिंदाल कंपनीकडून होणाऱ्या प्रदुषणामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत.जिंदाल पोर्ट मध्ये गॅस गळतीनंतर प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला होता.जिंदाल पोर्टच्या अंबुवाडीतील गॅस टर्मिनललाही ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.अशावेळी आज नांदिवडेच्या समुद्रकिनाऱ्यावर मृत माशांचा खच पडलेला पाहायला मिळाला.समुद्र किनाऱ्यावर मासे मरून पडल्याची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने खव्वय्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नांदिवडे गावचे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे आणि मच्छीमार रोहन सुर्वे यांनी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देत जिंदाल कंपनीने सोडलेल्या सांडपाण्यामुळे नांदिवडे किनाऱ्यावर मासे मरून पडले आहेत.तात्काळ हे प्रदुषित सांडपाणी बंद करावे आणि जिंदाल कंपनीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
अनेकांनी मासे खाणे बंद केले
ताज्या फडफडीत माशांसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीत मृत मासे सापडल्याने खळबळ उडाली आहे. नांदिवडे समुद्र किनारी मृत पडलेले मासे पाहून खव्वय्ये भयभीत झाले आहेत.अनेकांनी मासे न खाण्याचा निर्णय घेतला आहे.प्रदुषणामुळे जयगड परिसरातील मासेमारी संकटात सापडली असून भविष्यात मच्छिमार प्रदुषणाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.
गोबर, ताओज, पालू आणि फॅरे
नांदिवडे समुद्र किनाऱ्यावर गोबरा, ताऊज, पालू आणि शेतकं मरून पडलेली आढळून आली आहेत. हे १० ते १५ किलो वजनाचे मासे आहेत.
जिंदाल कंपनीमुळे समुद्रात प्रदुषण होत आहे.हे दुषित पाण्यातील मासे खाऊन कुणी आजारी पडल्यास जबाबदार कोण? गुरूनाथ सुर्वे, माजी सरपंच, नांदिवडे
मी स्वत: किनाऱ्यावर पहाणी केली. काही मासे मरून पडले आहेत. ते कशामुळे मरून पडले हे आता सांगता येत नाही. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी नुमने नेले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल – नरेश विलणकर, जनसंपर्क अधिकारी; जेएसडब्ल्यू एनर्जी
Comments are closed.