कुख्यात गुंड निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणी पोलिसांचा धडक तपास; कोथरूड पोलिसांची टीम अहिल्यानगरमध्ये दाखल

पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याने पासपोर्ट मिळवण्यासाठी खोटा पत्ता दाखविल्याच्या गंभीर प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. यानंतर कोथरूड पोलिसांची विशेष तपास टीम थेट अहिल्यानगर शहरात दाखल झाली असून त्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली.

पासपोर्ट अर्जामध्ये दिलेला पत्ता खरा आहे का याची खातरजमा करण्यासाठी ही टीम बुधवारी नगर शहरात आली होती. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह कोथरुड पोलिसांनी पासपोर्टवर नमूद केलेल्या सर्व ठिकाणांची पाहणी केली. घायवळने नगर शहरातील गौरी घुमट परिसरातील पत्ता दिला होता. या ठिकाणी पोलिसांनी येऊन संपूर्ण चौकशी केली.

सराईत गुन्हेगार असूनही घायवळला पासपोर्ट कसा काय मिळाला? पडताळणी करणारे अधिकारी काय करत होते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. घायवळसारख्या गुंडाला प्रशासनाकडून पासपोर्टसारखा महत्त्वाचा दस्तऐवज मिळणे ही थेट कायद्याच्या व्यवस्थेचीच बदनामी करणारी घटना ठरते. या प्रकरणात कोण कोण अधिकारी जबाबदार आहेत, याचा आता सखोल तपास करणे आवश्यक आहे.

Comments are closed.