Vaibhav Suryavanshi – कसोटी आहे का टी-20! वैभव सूर्यवंशीने पाडला षटकार-चौकारांचा पाऊस, ठोकलं खणखणीत शतक

वैभव सूर्यवंशीने कसोटी सामन्यातही आपला टी-20 मधला तोडफोड अंदाज कायम ठेवला आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वैभव सूर्यवंशीने खणखणीत शतक ठोकलं आहे. त्याने 86 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारांचा पाऊस पाडत 113 धावांची वादळी खेळी केली आहे. वैभवच्या जोडीने वेदांत त्रिवेदीने सुद्धा आपला हात धुवून घेतला आणि 140 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात सर्वगडी बाद 428 धावा केल्या आहेत.

ब्रिस्बेन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. 30 सप्टेंबरला सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 243 धावांवर संपुष्टात आला. दीपेश देवेंद्रने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत धाडला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. सलामीला आलेल्या वैभवने आक्रमक अंदाजात फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 86 चेंडूंमध्ये 113 धावा चोपून काढल्या. तसेच वैभव त्रिवेदीने सुद्धा जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत 192 चेंडूंमध्ये 19 चौकार मारत 140 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त खिलान पटेलने महत्त्वपूर्ण 49 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव सर्वगडीबाद 428 धावांवर संपुष्टात आला.

दुसऱ्या दिवसा अखेर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून 1 विकेट गमावत त्यांनी 8 धावा केल्या आहेत. दीपेशने सलामीचा फलंदाज अॅलेक्स ली यंगला भोपळाही फोडू दिला नाही. सध्या अॅलेक्स टर्नर (6*) आणि स्टिव्हन होगन (1*) धावांवर खेळत आहेत.

Comments are closed.