अथर्व तायडेच्या शतकाने विदर्भ भक्कम स्थितीत

अथर्व तायडेच्या नाबाद 118 धावा आणि यश राठोडच्या 91 धावांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर विदर्भाने इराणी करंडकाच्या सामन्यात शेष हिंदुस्थानविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 5 बाद 280 धावा करत भक्कम स्थिती मिळवली.

नागपूरमध्ये सुरू झालेल्या या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अथर्व तायडे आणि अमन मोखाडे यांनी पहिल्या विकेटसाठी 40 धावा जोडल्या. आठव्या षटकात आकाश दीपने मोखाडे (19) याला झेलबाद करून विदर्भाला पहिला धक्का दिला. यानंतर ध्रुव शौरीने तायडेसोबत दुसऱ्या विकेटसाठी आणखी 40 धावा जोडल्या. मात्र 23 व्या षटकात मानव सुथारने सलग दोन बळी घेत विदर्भाला अडचणीत टाकले. त्याने प्रथम ध्रुव शौरी (18) आणि लगेचच दानिश मालेवार (0) यांना बाद केले. त्यावेळी विदर्भाची धावसंख्या फक्त 80 धावा होती.

3 बाद 80 अशा बिकट परिस्थितीत क्रीजवर आलेल्या यश राठोडने तायडेसोबत डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 184 धावांची मौल्यवान भागीदारी केली. मात्र 74 व्या षटकात शतकाच्या उंबरठय़ावर असलेल्या यश राठोडला (91) मानव सुथारने झेलबाद करून विदर्भाला चौथा धक्का दिला. मग कर्णधार अक्षय वाडकरला (5) आकाश दीपने झेलबाद करून पाचवा झटका दिला. दिवसअखेर विदर्भाने 84 षटकांत 5 बाद 280 धावा केल्या होत्या. क्रीजवर अथर्व तायडे नाबाद 118 आणि यश ठाकूर नाबाद 4 धावांवर खेळत आहेत.

Comments are closed.