शंखनाद होणार, मशाल पेटणार! शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे मिनी विधानसभेचे रणशिंग फुंकणार!!शिवसेनेचा आज विराट दसरा मेळावा

महाराष्ट्रातील शेतकऱयावर अस्मानी संकट कोसळलं असताना आणि मुंबई महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेचा अतिविराट दसरा मेळावा उद्या दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ या मेळाव्यात धडाडणार असून बळीराजाला नागवणाऱया महाभ्रष्ट सरकारवर त्यांचा आसुड कडाडणार आहे. त्याचवेळी लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने मशाल पेटणार असून ‘मिनी विधानसभेचे’ रणशिंगच यावेळी फुंकले जाणार आहे. हा विजयाचा शंखनादच ठरणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा बनली आहे. गेली सहा दशके या मेळाव्याने महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचे काम केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि तेजस्वी विचारांचा अमूल्य ठेवा या व्यासपीठाने देशाला दिला. हीच परंपरा उद्धव ठाकरे पुढे घेऊन जात असून तमाम शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनतेचे लक्ष उद्याच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे कोणता नवा विचार देतात याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

शिवतीर्थावर काय?

– शिवतीर्थावरील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.

– मेळाव्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनतेसाठी चोख व्यवस्था केली आहे.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जपत शिवतीर्थावर सोने वाटप, शस्त्रपूजा केली जाईल. त्याचबरोबर रावण दहनही होईल.

तोफेच्या तोंडावर…

पहलगाम दहशतवादी हल्ला विसरून मोदी सरकारने हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये मांडलेला क्रिकेटचा डाव.

मुंबईवर डोळा ठेवून भाजपच्या दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या शेठजींची चाललेली कुटील कारस्थाने.

धारावीसह मुंबईतील मोक्याच्या जागा अदानीच्या घशात घालून मुंबईची ‘अदानी सिटी’ करण्याचा डाव.

भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून महाराष्ट्रासह देशभरात चालवलेली व्होटचोरी.

जुमलेबाजांना तडाखे बसणार

‘राजा तुपाशी, बळीराजा उपाशी’ असे भीषण चित्र सध्या राज्यात आहे. अस्मानी संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाभ्रष्ट सरकार केवळ आकडय़ांचा खेळ आणि घोषणांचा पाऊस पाडत आहे. शेतकऱयांचे डोळे मदतीकडे लागलेत आणि सत्ताधाऱयांचा डोळा निवडणुकीवर आहे. भाजप व त्यांच्या मित्रांच्या जुमलेबाजीवर उद्धव ठाकरे यांचे तडाखे बसणार आहेत.

Comments are closed.