केंद्रीय कर्मचारी, शेतकरी यांना मोठी दशेहरा भेट

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिवाळीपूर्वी महागाई भत्तावाढीची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दसरोत्सवातच मोठी भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होईल. दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदीतच केंद्र सरकारने ही घोषणा केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच केंद्र सरकारने बळीराजाला मोठा दिलासा देताना अनके धान्योत्पादनांवरील एमएसपीमध्ये वाढ केली आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारासह जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची थकबाकी दिली जाईल. हा दर मूळ वेतन आणि पेन्शनच्या 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारकांना लागू होईल. या वाढीचा फायदा अंदाजे 49.2 लाख कर्मचारी आणि 68.7 लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै अशा दोन टप्प्यात महागाई भत्त्यात सुधारणा करते. यावर्षी महागाई भत्त्यात झालेली ही दुसरी वाढ आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत ही सुधारणा शेवटची असण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

57 नवीन केंद्रीय विद्यालयांना मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाने 57 नवीन केंद्रीय विद्यालयांना मान्यता दिली आहे. 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 57 नवीन केंद्रीय विद्यालये (केव्ही) समाविष्ट करण्यास मान्यता दिल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. सध्या कोणतेही केंद्रीय विद्यालय नसलेल्या जिह्यांमध्ये 20 केव्ही उघडण्याचा प्रस्ताव आहे. 14 केव्ही आकांक्षी जिह्यांमध्ये, 4 केव्ही डाव्या अतिरेकी प्रभावित जिह्यांमध्ये आणि 5 केव्ही ईशान्य/पर्वतीय भागात प्रस्तावित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.