आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणार नाही! कमलताई गवई यांनी टाकला संभ्रमावर पडदा

अमरावती येथे 5 ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला जाणार नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.
कमलताईंना आरएसएसच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आल्याच्या वृत्तामुळे गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने एक पत्रही व्हायरल झाले. त्यातच आरएसएसच्या कार्यक्रमात जाण्यात गैर काय, अशी भूमिका त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी मांडली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. कमलताई गवई यांनी आज प्रसिद्धीपत्रक काढून यावर पडदा टाकला. ‘मला कार्यक्रमाचे निमंत्रण आले होते, पण माझे वय 84 वर्षे असून प्रकृती बरी नाही. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. त्यामुळे 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेले असते तरी आंबेडकरी विचारच मांडले असते!
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्यावर अनेकांनी दोषारोप केले. खरंतर आम्ही आंबेडकरी विचारांना वाहून घेतले आहे. मी त्या मंचावर गेले असते तरीही आंबेडकरी विचार आणि विपश्यनाच मांडली असती. तो संस्काराचा भाग आहे. दादासाहेबांचे (रा सु गवई) जीवनही आंबेडकरी चळवळीलाच समर्पित होते. ते जाणीवपूर्वक वेगळ्या विचारांच्या मंचावर जायचे आणि तिथे आंबेडकरी विचारच मांडायचे. हा धोरणाचा भाग होता, असे त्या म्हणाल्या.
Comments are closed.