वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतलं, फक्त 78 चेंडूत शतक ठोकत रचला विक्रमांचा र


इंडिया यू 19 वि ऑस्ट्रेलिया यू 19 चाचणी: भारताचा उभरता युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केवळ 14 वर्षे 188 दिवस वय असताना त्याने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ब्रिस्बेनमधील इयान हीली ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत अंडर-19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-19 युवा कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वैभवने फक्त 78 चेंडूंमध्ये तडाखेबाज शतक झळकावलं.

8 षटकार, 9 चौकारांचा धडाकेबाज खेळ

ऑस्ट्रेलियाला 243 धावांवर रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. ओपनिंगला आलेल्या वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. 8 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने त्याने केवळ 86 चेंडूंमध्ये 113 धावा फटकावत भारताला भक्कम स्थितीत नेलं. त्याच्या सोबत फलंदाजी करत असलेल्या वेदांत त्रिवेदीनेही उत्तम साथ दिली आणि दिवसाच्या शेवटी 116 धावांवर नाबाद राहिला. भारत अंडर-19 संघाला आता 95 धावांची आघाडी मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियात युवा कसोटीत सर्वात जलद शतक

वैभवचं हे शतक ऑस्ट्रेलियातल्या युवा कसोटी इतिहासातील सर्वात जलद शतक ठरलं आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या लियम ब्लॅकफोर्डच्या नावावर होता, ज्याने 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध 124 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. मात्र आता वैभवने तो विक्रम मोडीत काढत केवळ 78 चेंडूंमध्ये नवा इतिहास घडवला आहे.

युवक कसोटीत सर्वात कमी वयात शतक

फक्त वयाच्या 14व्या वर्षी, वैभवने शतक झळकावून ऑस्ट्रेलियातील युवक कसोटी सामन्यात सर्वात कमी वयात शतक करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. ही केवळ आक्रमक नव्हे, तर जबाबदारीचीही खेळी होती. ओपनिंगला येऊन त्याने संघाला शानदार सुरुवात करून दिली.

कर्णधाराचा विक्रमही मोडला

वैभवचं हे शतक युवक कसोटीत दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जलद शतक ठरलं आहे. यापूर्वी भारत अंडर-19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यानेच यंदा इंग्लंडविरुद्ध 64 चेंडूंमध्ये शतक ठोकून पहिलं स्थान मिळवलं होतं. वैभवची खेळी आता त्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण ती भारतीय क्रिकेटच्या भविष्याला उज्वल दिशा दाखवणारी नक्कीच आहे.

आधीही झळकलेत विक्रम

ही वैभवची पहिलीच मोठी खेळी नाही. यंदा इंग्लंड दौऱ्यात त्याने वयाच्या 15व्या वर्षी अर्धशतक आणि बॉलिंगमधून बांग्लादेशच्या मेहदी हसन मिराजचा विक्रम मोडला होता. त्याचबरोबर आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने केवळ 35 चेंडूंमध्ये शतक ठोकत, भारतीय फलंदाजाकडून आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. तो आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतक ठरला.

भारतीय क्रिकेटला मिळालं नवं रत्न

इतक्या लहान वयात, आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने दमदार कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी हे भारतीय क्रिकेटसाठी एक उगवतं रत्न ठरत आहे. पुढील काळात तो टीम इंडियाच्या संघात स्थान मिळवेल, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

हे ही वाचा –

India Beats Australia by 171 Unofficial ODI Scorecard : 19 षटकार, 39 चौकार; श्रेयस अय्यरची तुफान फलंदाजी, रियान परागही चमकला, भारताने पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा 171 धावांनी फडशा पाडला

आणखी वाचा

Comments are closed.