किमान वेतन, लेव्ही देण्यास प्रशासनाची टाळाटाळ; उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे नवी मुंबई पालिकेसमोर उपोषण

किमान वेतन आणि लेव्ही जात नसल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आजपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली छेडले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर ते दिघा विभाग कार्यालय कार्य क्षेत्रात एकूण १७ लाख ५०३ चौरस मीटर क्षेत्रफळात उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. या उद्यानात कार्यरत कामगारांना किमान वेतन आणि लेव्हीचे सर्व फायदे देणे बंधनकारक आहे पण उद्यान विभागातील ठेकेदारांशी, उद्यान विभागातील उद्यान विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने साधारण ४० कामगारांना किमान वेतन दिले जात नव्हते. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात होते. कामगारांना किमान वेतन आणि लेव्ही दिली जात नाही, असा आरोप समता समाज समता कामगार संघाचे सचिव मंगेश लाड यांनी केला आहे.
२०० कामगारांचा पगार जातो कुठे?
महापालिकेच्या धोरणाप्रमाणे २ हजार २०० चौरस मीटरसाठी एक कामगार याप्रमाणे १७ लाख ५०३ क्षेत्रफळासाठी ७७३ कामगार कार्यरत असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र उद्यान विभागात साडेचारशे कामगार कार्यरत आहेत. उर्वरित २०० कामगारांचे वेतनाचे पैसे अधिकारी आणि ठेकेदार दरमहा वाटून घेत आहेत. कामगारांना फक्त १२ हजार रुपये मासिक वेतन दिले जात आहे. पालिका या कामगारांवर २७ हजार रुपये खर्च करते, मग १५ हजार रुपये कोणाच्या खिशात जातात, असा मुद्दा मंगेश लाड यांनी उपस्थित करून याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
Comments are closed.