गाझामध्ये राहणारा दहशतवादी मानला जाईल, ताबडतोब खाली करा; इस्रायलच्या अंतिम अल्टिमेटममुळे घबराट

इस्रायल गाझा युद्धाचा संघर्ष आता दिवसागणिक अधिक गडद होत आहे. शांतता करारासाठी प्रयत्न केले जात असताना, इस्रायलने गाझा सोडण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. बुधवारी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी उर्वरित पॅलेस्टिनींना गाझा शहर सोडण्याचे आदेश दिले. त्यांनी सांगितले की, ही त्यांची शेवटची संधी आहे. त्यांनी इशारा दिला की, जे लोक शहरात राहतील त्यांना दहशतवाद्यांचे समर्थक मानले जाईल आणि त्यांना पुन्हा इस्रायली हल्ल्यांना सामोरे जावे लागेल.

दरम्यान, इस्रायलने बुधवारी गाझामध्ये आणखी एक हल्ला केला. गाझामधील स्थानिक रुग्णालयांनुसार, या हल्ल्यांमध्ये किमान १६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात इस्रायलने गाझा ताब्यात घेण्यासाठी मोठे आक्रमण सुरू केल्यापासून सुमारे ४,००,००० पॅलेस्टिनी गाझा शहर सोडून गेले आहेत. परंतु हजारो अजूनही आहेत.

इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दक्षिणेकडे जाण्याची आणि गाझा शहरात हमास दहशतवाद्यांना एकटे सोडण्याची इच्छा असलेल्या गाझा रहिवाशांसाठी ही शेवटची संधी आहे. जे गाझामध्ये राहतात त्यांना दहशतवादी आणि दहशतवादाचे समर्थक मानले जाईल.”

Comments are closed.