ट्रॉफी घेऊन पळणाऱ्या मोहसीन नक्वीला अख्तरने सुनावलं, नको नको ते बोलला, सगळ्या मर्यादा ओलांडल्या
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर (Ind vs Pak Asia Cup Final) एकतर्फी वर्चस्व गाजवत विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर चौफेर टीका होत आहे. स्वतः पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांनीही संघाच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) वर आणि देशातील क्रिकेटवर हल्लाबोल केला आहे.
“पीसीबीला आता लल्लू-कट्टू खेळाडूच हवेत….”
शोएब अख्तर म्हणाला की, “आज पीसीबीला ताकदवान, स्वतंत्र विचार करणारे खेळाडू नको आहेत. त्यांना शरीफ, आज्ञाधारक खेळाडू हवेत, जे रात्री आठ वाजता घरात जाऊन बसतील. ही मानसिकता आहे पीसीबीची. त्यांना कधीच नेतृत्वगुण असलेले खेळाडू नको असतात.”
नेतृत्व, निवड आणि रणनीतीवर सवाल
अख्तरच्या मते, या पराभवासाठी संघनिवड, रणनीती आणि नेतृत्व यांची कमतरता जबाबदार आहे. तो म्हणाला की, “संघाचं संयोजन चुकीचं होतं, कर्णधार योग्य निर्णय घेऊ शकत नव्हता, आणि व्यवस्थापन तर पूर्णतः अकार्यक्षम आहे. त्यांनी आमचं ऐकून घेणं तर दूरच, त्यांच्या निर्णयांना काहीच तर्क नव्हता.”
मोहसीन नक्वींवरही टीका
पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्यावरही अख्तरने रोष व्यक्त केला. “हे संपूर्ण प्रशासन मूर्खपणाचं आहे. ना खेळाडूंची निवड योग्य आहे, ना कप्तानीमध्ये सुसूत्रता आहे. संघामध्ये एकसंधता नाही, आणि हे सगळं वर्षानुवर्षं चालत आलेल्या चुकीच्या व्यवस्थापनाचं फलित आहे,” असं तो म्हणाला.
आशिया कपच्या फायनलनंतर राडा, नेमकं काय घडलं? (Asia Cup Trophy Controversy)
28 सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यानंतर दुबईतील मैदानात ट्रॉफीवरुन जोरदार राडा झाला. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानाच्या बाहेर निघून गेले. अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही.
मोहसीन नक्वीने माफी मागितल्याची समोर आली होती माहिती- (Asia Cup Trophy)
भारतीय माध्यमांमध्ये मोहसीन नक्वीने बीसीसीआयकडे माफी मागितल्याची माहिती समोर होती. आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जे झालं त्याबद्दल मी माफी मागतो. आपण नव्याने सुरुवात करु, क्रिकेटला मोठं करु, जे झालं ते व्हायला नको होतं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दुबईत स्वतः येऊन आशिया चषक आणि पदकं न्यावी, असं मोहसीन नक्वीने म्हटल्याचं समोर आलं होतं. परंतु या सगळ्या अफवा आहेत, मी माफी मागितलेली नाहीय, असं मोहसीन नक्वीने स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.