बेईमानी करणाऱ्यांना ज्या भाषेत समजेल, त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे, ही या महाराष्ट्राची परंपरा – संजय राऊत

राज्यात शिवसेनेचा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा हे दोनच दसरा मेळावे आहेत, इतर सर्व बोगस आहे, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांच्या दसरा मेळाव्यावर आसूड ओढले. तसेच गद्दारांच्या मेळाव्यावर चिखलेफेक करायची नाही तर काय करायचे? असा सवाल करत त्यांनी मिंध्यांना चांगलाच टोला लगावला.

शिवतीर्थावर चिखल आहे, आपल्या संस्कृतीतील अनेक सण चिखलाशी संबंधीत आहेत. शिमगा आहे, धुळवड आहे, तसेच विदर्भातही अनेक सण आहेत. त्यामुळे या मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना आपली संस्कृती माहिती नाही. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी नवीन परंपरा सुरू केली, ती म्हणजे गद्दारांचे मेळावे. आधी निष्ठावंतांचे मेळावे होत होते. मात्र, भाजप, मोदी, शहा यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात गद्दारांचे मेळावे होत आहेत. आता गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल नाही फेकायचा, तर काय करायचे? असा सवाल करत त्यांनी गद्दारांना जबरदस्त टोला लगावला. शिवतीर्थावरील चिखलात त्यांना लोळवावेच लागेल. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनीही तेच केले असते. ज्याची जी लायकी असते, त्याप्रमाणे त्याच्यावर त्या-त्या गोष्टींचा वर्षाव करायचा असतो. त्यामुळे आज गद्दारांवर चिखलफेक होणार असेल, तर त्यात अयोग्य आहे, असे वाटत नाही. पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्यांवर चिखल फेकलाच पाहिजे, हा राष्ट्रवादाचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवाद, महाराष्ट्रधर्म, संस्कृती यांचा प्रश्न येतो, त्यावेळी याच्याशी बेईमानी करणाऱ्यांना, तेव्हा ज्याला ज्या भाषेत समजेल, त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे, ही या महाराष्ट्राची परंपरा आहे. शिवतीर्थावरील चिखल हे आमच्यासमोर आव्हान नाही, आमच्यासमोर कसलेच आव्हान नाही, आव्हान असते, तर आम्ही त्या चिखलात गेलोच नसतो. निष्ठावंत शिवसैनिक उन-वारा,पाऊस, चिखल कसलाही पर्वा न करता शिवतीर्थावर येतील, हा विश्वास आम्हाला आहे. विचारांचे सोने ते राज्यातील कानाकोपऱ्यात नेतील. हा मेळावा किती विशाल होईल, हे सर्वांना समजेल, असेही ते म्हणाले.

शिंदे सेनेचा मेळावा म्हणजे अमित शहांनी स्थापन केलेला तो पक्ष म्हणजे त्यांची बेनामी कंपनी आहे, त्यात ते काय मार्गदर्शन करणार? लूटमार करा, भ्रष्टाचार करा, पैसे गोळा करा, महाराष्ट्राची लूट करा,मुंबई महाराष्ट्रापासून तोडून टाका, पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळा, हे सर्व अमित शहा यांचे विचार आहेत. त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, मोदी- शहा आल्यापासून राज्यात गद्दारांचे मेळावे होत आहेत. आता गद्दार बोलल्यावर कोणाला टोचत असेल, तर त्यांनी ते गद्दार कसे नाही, हे स्पष्ट केले पाहिजे. अमित शहा यांच्या मदतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना चोरली, अलिबाबा चोळीस चोरसारखा पक्ष, चिन्ह चोरले, त्यांचे अलीबाबा गुजरातमध्ये असतात, चाळीस चोर राज्याची लूट करत आहेत. हे मेळावे घेतात, हे राज्याला पटेल का? असा सवालही त्यांनी केला.

Comments are closed.