हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत दिनेश कार्तिक हिंदुस्थानचा कर्णधार

अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत हिंदुस्थान संघाचे नेतृत्व करणार आहेत. 40 वर्षीय कार्तिक याआधी ILT20 स्पर्धेत शारजाह वॉरियर्सकडून खेळण्यास तयार झाले होते. आता ते आपल्या जुन्या सहकाऱ्यासह तामीळनाडूचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनसोबत या सिक्स-ए-साइड स्पर्धेत उतरणार आहेत.
हाँगकाँग सिक्सेसमध्ये हिंदुस्थान संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या स्पर्धेचा इतिहास समृद्ध असून तो जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. अविश्वसनीय विक्रम असलेल्या खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व करणे ही मोठी संधी असून या स्पर्धेत रोमांचक क्रिकेट खेळून चाहत्यांचे मनोरंजन करण्यास उत्सुक असल्याचे कार्तिक म्हणाला.
क्रिकेट हाँगकाँग-चीनचे अध्यक्ष बुर्जी श्रॉफ यांनी कार्तिकच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, ‘दिनेश कार्तिकचा अनुभव आणि नेतृत्व या स्पर्धेला नवी उर्जा देईल आणि त्यांच्या उपस्थितीमुळे जागतिक स्तरावरील चाहत्यांना या क्रिकेट उत्सवाकडे आकर्षित केले जाईल.’
हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धा 7 ते 9 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या रोमांचक स्पर्धेत 12 संघ सहभागी होणार आहेत. यात हिंदुस्थान, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, यूएई, कुवैत, श्रीलंका, बांगलादेश आणि यजमान हाँगकाँग यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत संघांना चार गटांत विभागले गेले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांना नेहमीप्रमाणे एकाच गट-सी मध्ये ठेवण्यात आले आहे. गटातील अव्वल दोन संघांना क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळेल. क्वार्टर फायनल जिंकणारे संघ कप सेमीफायनल खेळतील, तर पराभूत संघ प्लेट सेमीफायनलमध्ये उतरणार आहेत.
Comments are closed.