सिराज, बुमरासमोर विंडीजची शरणागती; पहिल्या दिवसावर हिंदुस्थानचे वर्चस्व
मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा या हिंदुस्थानी वेगवान दुकलीसमोर पाहुण्या वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी वेस्ट इंडीजचा संघ अवघ्या 162 धावांवर कोसळला. त्यानंतर अनुभवी के. एल. राहुलने नाबाद अर्धशतक झळकावत हिंदुस्थानला मजबूत स्थितीत नेले.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हिंदुस्थानने 121 धावांवर 2 फलंदाज गमावले होते. अजूनही हिंदुस्थानी संघ 41 धावांनी पिछाडीवर आहे. मोहम्मद सिराज (4/40) आणि जसप्रीत बुमरा (3/32) यांनी पहिल्या दिवशी शानदार गोलंदाजी केली. पावसामुळे पहिल्या दिवशी काही षटके पडू शकली नाहीत.
राहुल आणि यशस्वी जयस्वाल या सलामीच्या जोडीने 68 धावांची भागिदारी केली. 36 धावा करून यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्यानंतर राहुल आणि बी. साईसुदर्शन जोडी फार काळ मैदानात टिकली नाही. अवघ्या 7 धावा करून साईसुदर्शन माघारी परतला, मात्र तरीही पहिला दिवस हिंदुस्थानने गाजवला.
यशस्वी जयस्वालने संयमी फलंदाजी केली. त्याने 37 चेंडू खेळल्यानंतर यशस्वीने पहिला चौकार लगावला. मात्र त्यानंतर यशस्वीने फटकेबाजी केली. त्याने पुढील 16 चेंडूंत आणखी 6 चौकार लगावले.
यशस्वीने 36 चेंडूंत 4 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर यशस्वीने दोन्ही बाजूंनी फटकेबाजी केली. 54 चेंडूंत 36 धावा करताना त्याने 7 चौकार लगावले. मोठय़ा फटक्याच्या प्रयत्नात जेडन सील्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक शाई होपकरवी झेल देत तो माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला साई सुदर्शन फार काळ मैदानात थांबू शकला नाही. राहुलसोबत दुसरी धाव घेताना तो एकदा गोंधळला. त्यानंतर लगेचच तो बाद झाला.
वेस्ट इंडीजचा कर्णधार रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारताना सुदर्शन बाद झाला. ऑफस्पिनरच्या गोलंदाजीवर पुल फटका मारताना चेंडूचा अंदाज चुकला आणि त्याला माघारी परतावे लागले.
तत्पूर्वी, हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना आपल्या नियंत्रणात ठेवले. त्यामुळे पाहुणा संघ अवघ्या 162 धावांवर सर्वबाद झाला. सिराजने लंचनंतर अप्रतिम इनस्विंग टाकत 24 धावांवर खेळणाऱ्या चेसला माघारी धाडले. यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने त्याचा झेल टिपला. कुलदीप यादवने पहिल्या सत्रात यष्टिरक्षक शाई होपचा त्रिफळा उडवला. त्याने दुसरा बळी रिव्हर्स स्वीपवर जोमेल वॉरिकनला झेलबाद केले. कुलदीपने 25 धावा मोजत 2 फलंदाज आपल्या सापळय़ात अडकवले.
वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. एक बळी मिळवताना त्याने 9 धावा दिल्या. तो फारच उशिरा गोलंदाजीला आला. वेस्ट इंडीजच्या जस्टिन ग्रिव्हसने सर्वाधिक 32 धावा केल्या. चेसने 24 आणि होपने 26 धावा केल्या, पण त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही.
राहुलचे नाबाद अर्धा -शताब्दी
के. एल. राहुलने पहिल्याच दिवशी या कसोटी मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. तो 114 चेंडूंत 53 धावांवर खेळत आहे. आपल्या या अर्धशतकीय खेळीत त्याने 6 चौकार लगावले. हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल 42 चेंडूंत नाबाद 18 धावांवर आहे. त्याने आपल्या 18 धावांच्या खेळीत एक चौकार लगावला आहे.
सिराजने पहिल्या सत्रात तीन बळी घेतले. त्यानंतर आणखी एक बळी घेत 4 बळी आपल्या नावे केले. बुमरानेही लाल चेंडूवर आपली ताकद दाखवली. त्याने 2 अप्रतिम यॉर्कर टाकून वेस्ट इंडीजला धडकी भरवली. बुमराने आपल्या 14 षटकांच्या स्पेलमध्ये 3 निर्धाव षटके फेकली. तसेच 42 धावा मोजत 3 फलंदाजांना माघारी धाडले. या वेगवान दुकलीने 7 फलंदाजांना आपल्या सापळय़ात अडकवले.
Comments are closed.