भिवंडीतील 218 बेकायदा इमारती जमीनदोस्त होणार, एमएमआरडीएची जोरदार तयारी

भिवंडी परिसरातील २१८ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यायाठी एमएमआरडीए प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या कारवाईसाठी प्रशासनाने पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. आतापर्यंत एमएमआरडीएने ६५ अनधिकृत बांधकामे नियमितही केली आहेत. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याने बांधकामधारकांची पळापळ उडाली आहे.
भिवंडी आणि आसपासच्या परिसरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनधिकृत बांधकामे थांबवण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली पथकेही तयार केली आहेत. ही पथके अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन ती निष्कासनासह नियमितीकरणासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. त्यानुसार भिवंडीतील ६० गावांतील १ हजार ५८१ अनधिकृत बांधकामांवर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
१४९ इमारती जमीनदोस्त
नोटिसा बजावण्यात आलेल्यांपैकी ४६२ अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी एमएमआरडीएने पोलीस बंदोबस्तासाठी मागणी केली आहे. यातील १४९ अनधिकृत बांधकामांचे निष्कासन पूर्ण झाले असून ९४ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर २१८ बांधकामांसाठी पोलीस बंदोबस्त मिळाला असून ही बांधकामे निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी अनधिकृत बांधकाम नियमितीकरण धोरणांतर्गत आतापर्यंत ६५ अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्यात आल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.
Comments are closed.