कॅनडामध्ये हिंदी चित्रपटांविरुद्ध द्वेष, थिएटरमध्ये चित्रपट सुरु असताना पुन्हा एकदा हल्ला

कॅनडातील ओकविल येथील एका थिएटरमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी गोंधळ घातला आहे. ओकविल येथील फिल्म सीए थिएटरमध्ये चित्रपटाच्या स्क्रिनींगदरम्यान गोळीबाराची घटना घडली. हिंदुस्थानी चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान होणारी जाळपोळ आणि गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. या हल्ल्यांमागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी दर्शवली आहे. या हिंसक घटनेनंतर, खबरदारी म्हणून हिंदूस्थानी चित्रपटांचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार (25 सप्टेंबर) सकाळी 5:20 च्या दरम्यान पहिली घटना घडली. यावेळी दोन अज्ञातांनी थिएटरच्या प्रवेशद्वारावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयितांनी काळे कपडे आणि मास्क घातलेले दिसले. हे हल्लेखोर ग्रे आणि व्हाईट SUV मधून लाल गॅस कॅन घेऊन आले होते. त्यानंतर त्यांनी सिनेमागृहाला बाहेरून आग लावण्याचा प्रयत्न केला आणि तेथून पळ काढला. दरम्यान वेळीच ती आग विझवल्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले नाही.
दरम्यान, एका आठवड्यातच दुसरी घटना घडली. (2 ऑक्टोबर) मध्यरात्री 1.50च्या सुमारास पुन्हा हल्ला करण्यात आला. यावेळी संशयीतांनी थिएटरच्या बाहेर गोळीबार केल्याची माहिती आहे. हे हल्लेखोर काळे कपडे आणि मास्क घालून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Film.Ca Cinemas वर झालेल्या या भयंकर हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यासंदर्भात थिएटरचे सीईओ जेफ नॉल यांनी माहिती दिली. आम्ही फक्त साऊथ एशियन चित्रपट थिएटरमध्ये दाखवल्याने हे हल्ले करण्यात आले आहेत. आमच्या प्रेक्षकांना येथे सुरक्षित वाटणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचे चित्रपट आम्ही नक्की दाखवू असे, थिएटरचे सीईओ जेफ नॉल म्हणाले.
Comments are closed.