वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूचा ऐतिहासिक पराक्रम, तब्बल 199 किलो वजन उचलत जिंकले रौप्यपदक
नॉर्वेच्या फोर्डे येथे सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकले. स्पर्धेच्या इतिहासातील हे तिचे तिसरे पदक आहे. भारतासाठी सर्वाधिक जागतिक अजिंक्यपद पदके जिंकणारी ती तिसरी वेटलिफ्टर बनली आहे. यापूर्वी, तिने 2017च्या अनाहिम येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 48 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. 2022 मध्ये तिने 49 किलो गटात रौप्य पदक जिंकले होते.
मीराबाई चानूने 48 किलो गटात एकूण 199 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलून दुसरे स्थान पटकावले. उत्तर कोरियाच्या री संग गमने एकूण 213 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. चीनच्या थान्याथनचा सामना मीराबाईशी झाला.
थान्याथनने कांस्यपदक जिंकले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की स्नॅच राउंडमध्ये थान्याथन मीराबाईंपेक्षा 4 किलोने आघाडीवर होती, परंतु क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मीराबाईंनी उत्कृष्ट कामगिरी करत चिनी खेळाडूला मागे टाकले आणि १ किलोने आघाडी घेत रौप्य पदक जिंकले.
विजयानंतर मीराबाई चानू थेट तिचे प्रशिक्षक विजय शर्मा यांच्याकडे गेली आणि त्यांचे आभार मानले. दुखापतीमुळे मीराबाई चानूसाठी गेल्या काही वर्षांमध्ये कठीण परिस्थिती होती. या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत मीराबाईंनी सुवर्णपदक जिंकले.
मीराबाई चानू भारतासाठी दोनदापेक्षा जास्त वेळा वर्ल्ड अजिंक्यपद विजेतेपद जिंकणारी तिसरी खेळाडू ठरली आहे. कुंजराणी देवी आणि कर्णम मल्लेश्वरी यांनीही ही कामगिरी केली आहे. कुंजराणीने या स्पर्धेत सात वेळा (1989, 1991, 1992, 1994, 1995, 1996, 1997) रौप्य पदक जिंकले. मल्लेश्वरीने 1994 आणि 1995 मध्ये सुवर्ण आणि 1993 आणि 1996 मध्ये (एकूण चार) कांस्यपदक जिंकले.
Comments are closed.