रोहित शर्माचा 264 धावांचा जागतिक विक्रम मोडणार हा खेळाडू, भारताच्या माजी प्रशिक्षकांचा मोठा दावा!
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. रोहितने 2014 साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना 264 धावा केल्या होत्या. हा विक्रम आजही कायम आहे. मात्र, आता हा विक्रम मोडला जाऊ शकतो अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी एका फलंदाजाचे नाव घेतले आहे, जो भविष्यात रोहितचा 264 धावांचा विक्रम मोडू शकतो.
‘द ग्रेट इंडियन क्रिकेट शो’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमात संजय बांगर यांना विचारण्यात आले की, रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध केलेला 264 धावांचा विक्रम कोण मोडू शकतो? या प्रश्नावर बांगर यांनी यशस्वी जयस्वाल आणि अभिषेक शर्मा यांचे नाव घेतले नाही. त्याऐवजी त्यांनी शुबमन गिलचे (Shubman gill) नाव घेतले.
बांगर म्हणाले, “शुबमन गिलनेही वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे. त्यामुळे त्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे. जर शुबमन गिल 45-46 षटकांपर्यंत टिकून खेळला, तर तो नक्कीच हा विक्रम मोडू शकतो.
आत्तापर्यंत 55 वनडे सामन्यांत गिलने 59.04 च्या सरासरीने 2,755 धावा केल्या आहेत. त्यात 8 शतके आणि 15 अर्धशतके आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोर 208 धावा आहे, जो त्याने 2023 च्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध केला होता. हैदराबाद येथे गिलने सलामीला खेळताना फक्त 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांसह 208 धावा झळकावल्या होत्या. तेव्हा त्याने 48.3 षटकांत ही कामगिरी पूर्ण केली होती. शुबमन गिल हा सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि ईशान किशननंतर वनडेत द्विशतक करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
याशिवाय बांगर यांना खात्री आहे की, युवराज सिंगचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम अभिषेक शर्मा मोडू शकतो. युवराजने 2007 च्या टी-20 विश्वचषकात डरबन येथे इंग्लंडविरुद्ध फक्त 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. बांगर म्हणाले, हा विक्रमही अभिषेकच मोडू शकतो. तो माझा शिष्य आहे आणि माझ्यासारखाच षटकार मारण्यात तरबेज आहे.
Comments are closed.