ध्रुव जुरेलचे पहिले वादळी शतक! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना घाम फोडला, पहिल्या कसोटीत भारताचे वर


वेस्ट इंडीजविरूद्ध अहमदाबाद कसोटी सामन्यात ध्रुव ज्युरेल 1 शतक: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीत टीम इंडियाने ठोस पकड मिळवली आहे. आधी सलामीवीर के. एल. राहुलने कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने आपली धमाकेदार खेळी साकारत कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले असून, त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. जुरेलच्या या दमदार खेळीमुळे आणि राहुलच्या शतकामुळे भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजवर तब्बल 230 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या वर्चस्वामुळे अहमदाबाद कसोटीतील निकालाची दिशा जवळपास ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ऋषभ पंत दुखापतग्रस्त अन् ध्रुव जुरेलला मिळाली संधी

ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध तो खेळणार नव्हता, त्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली होती. प्रश्न होता की, पंतच्या जागी कोण खेळणार? संघात पर्याय उपलब्ध होते, पण पंतसारखी आक्रमक फलंदाजी करणं सोपं नव्हतं. अशा वेळी ध्रुव जुरेलचे नाव पुढे आले. जुरेल हा पंतसारखाच धाडसी खेळाडू आहे आणि त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलं की तो कसोटीत मोठी खेळी करण्याची ताकद ठेवतो.

रांचीतील ध्रुव जुरेलचं अपूर्ण स्वप्न पूर्ण

जुरेलचा हा फक्त सहावा सामना आहे, पण एवढ्यातच त्याने आपली कसोटी स्तरावरची पात्रता सिद्ध केली आहे. जुरेलला पहिल्यांदा संधी इंग्लंडविरुद्ध 2024 च्या घरच्या मालिकेत मिळाली. तेव्हाही पंत दुखापतग्रस्त होता आणि के. एस. भरत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला होता. राजकोट कसोटीत जुरेलने पदार्पण केले आणि पहिल्या डावात 46 धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

यानंतर रांची कसोटीत तो रंगात आला. पहिल्या डावात त्याने जबरदस्त फलंदाजी केली. असं वाटत होतं की त्याचा पहिला कसोटी शतक नक्की होईल, पण तो 90 धावांवर बाद झाला. त्या वेळी तो खूप निराश झाला कारण अशी संधी पुन्हा मिळणं कठीण होतं. आणि खरंच, पंतच्या पुनरागमनानंतर जुरेलची जागा संघात राहणं कठीण होतं. मात्र दीड वर्षांनी पंत पुन्हा दुखापतग्रस्त झाल्यावर जुरेलला संधी मिळाली आणि त्याने पहिलं कसोटी शतक ठोकत रांचीमध्ये राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण केलं.

आणखी वाचा

Comments are closed.