कॅनडामध्ये हिंदुस्थानी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी, काय आहे कारण?

कॅनडातील एका चित्रपटगृहात चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या दोन हिंसक हल्ल्यांमुळे तिथे हिंदुस्थानी चित्रपट दाखवण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान गोळीबार आणि आग लावण्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यांमागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील ओकव्हिल येथील Film.Ca Cinemas जवर हिंसक हल्ले झाले. त्यानंतर हिंदुस्थानी चित्रपटांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले. हिंदुस्थानी चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान हा हल्ला झाला, ज्यामुळे आत असलेल्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. आठवड्यातून दोनदा हे हल्ले झाले. पहिला हल्ला २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५:२० वाजता झाला, जेव्हा दोन संशयितांनी थिएटरच्या दारावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर लाल गॅस कॅनने सज्ज होते आणि बाहेरून आग लावली. इमारतीचे किरकोळ नुकसान झाले, परंतु आग आत पसरली नाही.
पोलिसांचे म्हणणे आहे की, दोन्ही संशयितांनी काळे कपडे आणि मास्क घातले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक ग्रे एसयूव्ही आणि एक पांढरी एसयूव्ही इमारतीतून येताना आणि पळून जाताना दिसत आहे. दुसरा हल्ला २ ऑक्टोबर रोजी झाला. पहाटे १:५० वाजता एका संशयिताने थिएटरच्या प्रवेशद्वारावर गोळीबार केला. दोन्ही हल्ले हिंदुस्थानी चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान झाले.
Comments are closed.