विश्वकर्मा गुजरात भाजपा अध्यक्ष म्हणून नियुक्त

वृत्तसंस्था / गांधीनगर

भारतीय जनता पक्षाच्या गुजरात शाखा अध्यक्षपदी जगदीश विश्वकर्मा यांची नियुक्ती होणार, हे आता निश्चित झाले आहे. या पदासाठी त्यांचा एकट्यांचेच आवेदनपत्र आले असल्याने त्यांची निर्विरोध निवड होणार हे निश्चित आहे. मात्र, त्यासंबंधीची अधिकृत घोषणा आज शनिवारी होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

विश्वकर्मा हे अन्य मागासवर्गीय समाजातले असून ते उद्योगपती आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. 2021 पासून ते गुजरात मंत्रिमंडळाचे सदस्य असून त्यांच्याकडे सहकार विभाग आहेत. आता त्यांच्यावर राज्य अध्यक्षपदाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनान्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर उत्तर प्रदेश शाखेचे अध्यक्ष निवडले जाणार आहेत..आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने 25 राज्यांमधील अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली असून आता उत्सुकता राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशात संघटनात्मक निवडणुका झालेल्या नसल्याने राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. आता गुजरातमधली स्थिती स्पष्ट झाली आहे. त्यामुळे लवकरच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही निवडले जातील, असे निश्चितपणे मानण्यात येत आहे.

Comments are closed.