जग निसर्ग, पर्यावरण, प्राणी अभ्यासकाला मुकले,डॉ. जेन गुडाल यांच्या निधनाने हळहळ

जागतिक स्तरावर विविध वैज्ञानिक संशोधनांमधून क्रांती घडवणाऱया, मानववंशशास्त्रज्ञ, महिला शास्त्रज्ञ आणि आफ्रिकेतील चिपांझींवर सखोल संशोधन करून अवघ्या जगाची दृष्टी बदलण्याचे मोठे कार्य करणाऱया संशोधक डॉ. जेन गुडाल यांच्या निधनामुळे निसर्ग, पर्यावरण, प्राणी अभ्यासक हरपला आहे. 91 व्या वर्षी त्यांचे बुधवारी निधन झाल्याचे ‘जेन गुडाल इन्स्टिटय़ूट’ने जाहीर केले. त्यांच्या निधनाबद्दल जागतिक संशोधन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. जेन गुडाल यांचा जन्म 1934 मध्ये लंडन येथे झाला. त्या 1957 मध्ये केनियाला गेल्या. या ठिकाणीच त्यांना खऱया अर्थाने प्राणीसृष्टीची प्राथमिक ओळख झाली. यानंतर त्यांनी मानववंश शास्त्रज्ञ व जीवाश्मशास्त्रज्ञ लुई लिकी यांच्या निमंत्रणावरून 1960 मध्ये चिपांझीवर संशोधन सुरू केले.

चिपांझीचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी त्यांनी 1977 मध्ये ‘जेन गुडाल इनिस्टटय़ूट’ची स्थापना केली. निसर्ग आणि मानव यांच्यातील एक दुवा म्हणून काम करताना त्यांनी तब्बल 65 देशांत पर्यावरण प्रकल्प राबवले. त्यांचे संशोधन पर्यावरण संरक्षण मानव आणि पर्यावरणाचे नाते सांगणारे, दृढ करणारे होते. चिपांझी संशोधनात त्यांनी इतके कार्य केले की, चिपांझींसोबत त्यांचे नाते अतूट बनले. चिपांझींना त्यांनी विशिष्ट नावेही दिली होती. 1963 मध्ये त्यांच्या संशोधनाची दखल ‘नॅशनल जिओग्राफीने’ही घेत कव्हरस्टोरी आणि डॉक्युमेंटरीमध्येही स्थान दिले होते. त्यांनी तीसहून अधिक पुस्तके लिहिली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट

‘जेन गुडाल इन्स्टिटय़ूट इंडिया’च्या वतीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’च्या निमित्ताने त्या हिंदुस्थानात आल्या होत्या. मुंबईच्या या दौऱयात त्यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन सर्व कर्मचाऱयांशी संवादही साधला होता.

300 दिवसाचे जग्प मुखवटा

गुडाल यांनी गोब्मेतील चिपांझींवर संशोधन केल्यावर सर्वच माकडे शाकाहारी नसल्याचा निष्कर्ष काढला. चिपांझींच्या टोळय़ांमध्ये होणारी युद्धेही पाहिली. चिपांझींच्या टोळीवर सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांचे लचके तोडणारे चिपांझी असल्याचा निष्कर्षही त्यांनी काढला. त्यांच्या संशोधनाचे लिखाण अगदी सर्वसामान्यांच्याही पसंतीस पडणारे ठरले. त्या वर्षातले 300 दिवस जगभर प्रवास करीत. वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संकटावर त्या व्याख्याने देत. प्राण्यांनाही भावना, व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक वर्तन असते हे त्यांनी संशोधनातून सिद्ध केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

डॉ. गुडाल यांनी चिपांझीवर संशोधन करून केंब्रीज विद्यापीठातून ‘पीएचडी.’ पदवी मिळवली होती. आफ्रिकेतील वन्यजिवांच्या घटणाऱया संख्येवर चिंता व्यक्त करताना जगाने प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्र परिषदेने 2002 मध्ये त्यांच्या नावाची घोषणा शांतीदूत म्हणून केली होती. विविध विषयांवर संशोधन करणार्या डॉ. जेन यांना ‘विज्ञान व आध्यात्म यांची सांगड घालणार्या वैज्ञानिकांना देण्यात येणारा ‘टेम्पलटेन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व्हाईट हाऊसने जानेवारी 2025 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याहस्ते राष्ट्रपती पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Comments are closed.