पहिली कसोटी, दुसरा दिवस; तीन शतकांचा उत्सव!
>>संजय कऱ्हाडे<<
गुरुवारचा दिवस शतकी उत्सवाचाच म्हणावा लागेल! काय महिमा वर्णावा त्याचा. फक्त उदो म्हणा, उदो म्हणा…
पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी के. एल. राहुलने पुण्याच्या रहदारीमध्ये गाडी चालवताना लागणाऱ्या एकाग्रतेने फलंदाजी केली. मधूनच डावा हात दाखवून उजवीकडे वळणाऱ्या ऑटोसारखा उलटय़ा स्वीपचा फटकाही अवतरला, पण त्याची अकराव्या शतकाची एकाग्रता मोडू शकला नाही! गेल्या सहा कसोटी सामन्यातलं त्याचं हे तिसरं शतक! इंग्लंडमध्ये त्याने दोन शतपं झळकावली होती.
कप्तान शुभमन गिलने राहुलबरोबर छान फलंदाजी केली, पण त्याचीही बॅट आडवी झाली अन् उलटा स्वीप मारण्याच्या नादात त्याला बाद करून गेली. आता त्या टोपीखाली दडलंय कायच्याच सुरात विचारावं वाटतंय की, त्या आडव्या बॅटीत दडलंय काय! पहिल्या दिवशी यशस्वी, साईनंतर दुसऱ्या दिवशी आडव्या बॅटचा तिसरा बळी गिल ठरला. तिघांनीही मोठी संधी दवडली. घरच्या खेळपट्टय़ांवर मोठय़ा फटक्यांच्या नादात ‘सीमोल्लंघन’ केलं!
त्यानंतर मात्र जुरेलने फार छान तंत्रशुद्ध फलंदाजी केली. त्याचे कट, पंच, फ्लिक्स आणि ड्राईव्हज मस्त होते. पहिल्या डावात चार झेल आणि आजची सुंदर शतकी खेळी त्याची संघातली जागा मजबूत करील यात वादच नाही. तो धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाला. जडेजाने चमकदार शतकी खेळी केली. प्रथमच मिळालेलं उपकप्तानपद त्याने साजरं केलं असंही म्हणायला हरकत नाही. त्याने वॉरिकनला भिरकावलेले पाच षटकार खणखणीत होते आणि ग्रीव्हजला मारलेला सरळ ड्राईव्ह निव्वळ देखणा!
या कसोटीत हिंदुस्थानला दुसऱ्यांदा फलंदाजी करावी लागेल असं वाटत नाही.
विंडीजचे आडाखे मात्र आकलनापलीकडले होते. जलदगती सील्सचा उल्हास जुन्या बॉलमुळे मावळला. फिरकीला मदत करणाऱ्या बुटखुणांचाही पेर, वॉरिकनला फारसा फायदा उठवता आला नाही. कप्तान चेसने बळी मिळवले, पण त्याच्या गोलंदाजीत एकसारखेपणा दिसला. किंचित पंटाळलेपणासुद्धा! खेळपट्टीवर चेंडू पडल्यावर धूळ उडत होती, चेंडूची उसळी असमान होती. त्याच मोहात ते गुरफटले! विंडीजच्या संघाला नव्या चेंडूपासून दूर राहिलेलं तर प्रथमच पाहायला मिळालं. स्थिरस्थावर झालेल्या हिंदुस्थानी फलंदाजांना बाद करण्यासाठी आवश्यक असणारी प्रयोगशीलतासुद्धा त्यांनी टाळली.
काहीसा तसाच दृष्टिकोन कप्तान गिलसुद्धा ठेवेल. आज किमान चहापानापर्यंत फलंदाजी करून विंडीजला चौथ्या दिवशी लपेटून मालिकेची विजयाने सुरुवात करेल असा होरा आहे!
Comments are closed.