नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दि.बा. पाटील यांच्या नावाच्या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती केली होती. दि.बा. पाटील यांच्या नावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. पुणे व छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या नावांसाठी लवकरच मान्यता मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 व 9 तारखेला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आयोजित केली होती.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशा नावाने पूर्वी परवानगी दिली होती. त्यामध्ये नामविस्तार होऊन आता लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होईल. राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव देण्यात येईल.

या बैठकीला वन मंत्री गणेश नाईक, आमदार रवींद्र चव्हाण, लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, खासदार कपिल पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार संजय पाटील, माजी खासदार संजीव नाईक, जगन्नाथ पाटील, राजू पाटील, सुभाष भोईर, जे.एम. म्हात्रे, जगदीश गायकवाड, दशरथ भगत, जे.डी. तांडेल व अन्य उपस्थित होते.

लवकरच नामकरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला असून राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन केंद्र शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. केंद्र शासनाच्या स्तरावर अशा नामकरणासाठी निश्चित असे धोरण ठरविले जात आहे. त्यामुळे वेळ लागत आहे. नवीन धोरणानुसार विमानतळाचे नामकरण लवकरच होणार आहे.

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळ नामकरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह राज्यातील पुणे येथील सध्याच्या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम यांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव आणि छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तिन्ही प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असून राज्य शासनाच्या मागणीनुसार व नवीन धोरणानुसार नामविस्तारांना लवकरच मान्यता मिळणार आहे. इतर राज्यातीलदेखील प्रस्ताव असेच मान्यतेसाठी प्रतीक्षेत आहेत.

आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आंदोलनकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. या आंदोलनातील गुह्यांमुळे विमानतळावरील नोकरी मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी हे गुन्हे रद्द करण्याचे निर्देश देण्यात येतील. तसेच सदर आंदोलने कोविड काळातदेखील झाले असल्याने काही आंदोलनकर्त्यांवर कोविड तरतुदीनुसार गुन्हे दाखल असून असे गुन्हे नियमानुसार न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने घेतला होता निर्णय

लोकभावनेचा आदर करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धन ठाकरे यांनी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. 29 जुलै 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे विमानतळाचे नामकरण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

Comments are closed.