सोनम वांगचुक यांच्या अटकाविरूद्ध याचिका
पत्नी गीतांजलीने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे द्वार
वृत्तसंस्था/ लेह, नवी दिल्ली
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली हिने अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. याचिकेत केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाला पक्षकार करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी ही याचिका दाखल करण्यात आली. गीतांजली हिने आपल्या याचिकेत पतीची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. एक आठवडा उलटूनही अटकेचा कोणताही आधार सापडला नाही. तसेच आपल्याला पतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळेच त्यांनी पती सोनम वांगचुक यांच्या तात्काळ सुटकेसाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. त्यांनी येत्या सोमवारी आपल्या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
गेल्या आठवड्यात स्वतंत्र लडाख राज्याच्या मागणीसाठी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारात चार जणांचा बळी गेला होता. या हिंसाचाराला कारणीभूत ठरवत सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली होती. ही अटक करताना त्यांच्या एनजीओने नियमांचे उल्लंघन करत विदेशातून आर्थिक लाभ मिळविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यांच्यावर गंभीर कलमे लावल्यामुळे त्यांना जामीन मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.
Comments are closed.