मृत्युनंतरही बाळासाहेबांची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, संजय राऊत यांचा रामदास कदम यांना इशारा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युचेही राजकारण करणारे मिंधे गटाचे नेते रामदास कदम यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गर्भित इशारा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्युनंतर जी विटंबना हे लोक करत आहेत, त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिला.
संजय राऊत म्हणाले की, रामदास कदम हा कधीच भरवशाचा माणूस नव्हता. खरे म्हणजे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो लावून पूजा केली पाहिजे. कोकणात विधानसभेची निवडणूक हरल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवले. दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्याने पाठवायला पक्षाचा विरोध होता. त्यातले एक रामदास कदम आणि दुसऱ्या निलम गोऱ्हे.
निलम गोऱ्हे यांचे पक्षातील योगदान काय? हा प्रश्न कायम विचारला जातो आणि रामदास कदम यांना इतके वर्ष आमदार, मंत्री म्हणून संधी मिळाल्याने त्यांना वारंवार विधान परिषदेवर का पाठवता? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पक्षातून विचारण्यात आला. तरीही उद्धव ठाकरे हे दया बुद्धीचे गृहस्थ असल्यामुळे त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर (12 वर्ष) पाठवले. अशा माणसाने ठाकरे कुटुंबाप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे. पण आता ते गरळ ओकत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
Comments are closed.