Cough Syrup Deaths: कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू, अखेर केंद्र सरकारने जारी केले निर्देश

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपमुळे तब्बल १२ मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर तामिळनाडू सरकारने या कफ सिरपवर बंदी घातली आहे. बाजारातून हे कप सिरप हटवण्याचे आदेश दिले आहेत. तर केंद्र सरकारने देखील महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू होत असल्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे हे औषध विष का बनतंय? हा प्रश्न पडतो. याबाबत केंद्र सरकारने काय निर्देश दिलेत ते जाणून घेऊया..

खरे तर लहान मुलांना खोकला झाला की आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता त्यांना एखादे कफ सिरप देतो. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. लहान मुलांना कफ सिरप देताना कायम डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश जारी केला आहे. त्यात असे म्हंटले आहे की, मुलांना खोकला झाल्यास तो आपोपाप कमी होतो. त्यांना औषधे देण्याची गरज नसते.

तसेच 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला किंवा सर्दीचे सिरप देणे टाळावे. तर ५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना सिरप देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी लिहून दिल्यावरच मुलांना सिरप द्यावे.

एखादे सिरप देताना योग्य डोस द्यावे. तसेच एकाच वेळी अनेक सिरप मुलांना देऊ नये. औषधाचा डोस आणि वेळेबाबत बाबत डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.

तसेच डॉक्टरांना देखील काही सल्ले देण्यात आलेले आहेत. त्यानुसार, डॉक्टरांनी मुलांसाठी लगेच एखादे औषध लिहून देण्यापेक्षा त्याशिवाय मुलांचा त्रास कमी करण्याचे पर्याय द्यावे. मुलांना भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ पिण्याचा, विश्रांती घेण्याचा आणि स्टीम इनहेलेशन आणि कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला पाहिजे.

याशिवाय सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य संस्थांनी हे सुनिश्चित करावे की औषधे फक्त चांगल्या दर्जाच्या कंपन्यांकडूनच खरेदी केली जातात, असेही सरकारने सांगितले आहे.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइल सॉल्व्हेंट मिसळल्याचा आरोप
दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी ७ सप्टेंबरपासून छिंदवाडा जिल्ह्यात संशयास्पद किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या मृत्यूसाठी कफ सिरपमध्ये “ब्रेक ऑइल सॉल्व्हेंट” मिसळल्याचा आरोप केला आहे. तर आरोग्य मंत्रालयाने कंपनीला प्रयोगशाळेतील अहवाल येईपर्यंत सिरपचे उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Comments are closed.