रक्ताने हात माखलेल्यांनी मराठा समाजाबद्दल बोलू नये! मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडे यांना इशारा

‘ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, त्यांनी मराठा समाजाबद्दल बोलू नये. तुम्हीच बंजारा समाजाचे आरक्षण खाताय आणि आमच्यावर लांच्छन लावताय, माझ्या नादी लागू नका, नसता अजित पवारांचाही थेट कार्यक्रम लावायला मागेपुढे पाहणार नाही!’ असा स्पष्ट इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांना दिला. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे, त्यांच्या मागण्यांसाठी दिवाळीनंतर आंदोलन करणार असल्याची माहितीही यावेळी जरांगे यांनी दिली.

काल भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी ‘आमचा आरक्षणाला विरोध नाही, पण आमच्या ताटातले घेऊ नका’ असे वक्तव्य केले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी ‘मराठा आरक्षण लागू झाल्याचा आम्हाला अभिमान आहे, पण काही जणांना या आरक्षणाच्या आडून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे आहे’ असा आरोप मनोज जरांगे यांचे नाव न घेता केला.

आज मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बंधू-भगिनीच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. आम्ही ओबीसीच्या हक्काचे आरक्षण घेत असल्याचा आरोप करताय, मग तुम्ही बंजारा समाजातून आरक्षण का घेतले? बंजारा समाजाचे आरक्षण तुम्ही खाताय, हे लक्षात ठेवा. माझ्या नादी लागू नको, ज्याचे हात रक्ताने बरबटलेले आहेत, त्याने मराठा समाजावर बोलायचे नाही, नसता तुम्हा दोघांचा बाजार तर उठवेनच, पण अजित पवारांचाही थेट कार्यक्रम लावेन ! धनंजय मुंडे किती हुशार आहे आम्हाला माहिती आहे. शहाणे असाल तर आमच्या नादी लागू नका, अन्यथा राजकारणातून नामोनिशाण संपवू, असा इशाराच जरांगे यांनी दिला.

Comments are closed.