रोहितच्या कर्णधारपदातील बदलामागचं खरं कारण उघड! आगरकर यांनी केला मोठा खुलासा

बीसीसीआयने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या जागी 26 वर्षीय तरुण सलामीवीर शुबमन गिलला वनडे संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यानंतर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहित शर्माने स्वतःहून कर्णधारपद सोडले का, की त्याला पदावरून हटवण्यात आले आहे? सध्या याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टता आलेली नाही. भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर यांच्या वक्तव्यावरून असे संकेत मिळत आहेत की रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे.

शनिवारीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच श्रेयस अय्यरला तीन सामन्यांच्या मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर यांनी पुष्टी केली आहे की रोहित शर्माला कर्णधारपदातील बदलाबद्दल आधीच कळवण्यात आले आहे. मात्र जेव्हा त्यांना विचारण्यात आले की रोहित आणि विराट 2027 चा विश्वचषक खेळणार आहेत का, तेव्हा त्यांनी यावर थेट उत्तर दिले नाही. अगरकर म्हणाले, “सध्या ते या फॉरमॅटमध्ये खेळत आहेत आणि आम्ही त्यांची निवड केली आहे. 2027 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर मला वाटते आजच्या कर्णधारपद बदलाच्या दिवशी त्यावर चर्चा करण्याची गरज नाही.”

रोहित शर्माने हा निर्णय कसा घेतला, असे विचारल्यावर अगरकर म्हणाले, “ही बाब निवड समिती आणि रोहित यांच्यातील आहे.”

अगरकर यांनी स्पष्ट सांगितले की आता पुढे काहीच वनडे सामने उरले आहेत, त्यामुळे तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगळे कर्णधार ठेवणे अशक्य आहे, कारण त्यामुळे रणनीती आखण्यात अडचण येते. त्यांनी म्हटले, “व्यवहार्य दृष्टिकोनातून पाहता, तिन्ही फॉरमॅटसाठी तीन कर्णधार ठेवणे शक्य नाही. त्यामुळे रणनीती ठरवणे अवघड होते.”

ते पुढे म्हणाले, “एखाद्या टप्प्यावर जाऊन तुम्हाला पुढील विश्वचषकाचा विचार करावा लागतो, आणि हा फॉरमॅट आता फारच कमी खेळला जातो. त्यामुळे नव्या कर्णधाराला संधी देण्यासाठी जास्त सामनेही उपलब्ध नाहीत. त्याला स्वतःला तयार करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.”

Comments are closed.